ठाणे : दिवा शहरात सध्या मोठ्य़ा प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. या शहरातील वाहतूकीचं मुख्य ठिकाण म्हणजे दिवा चौैक. या दिवा चौकचे नामांतर करण्याची मागणी सध्या होताना दिसत आहे. या मागणीसाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
दिवा चौकाचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करावे अशी मागणी मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे. याबाबत येत्या 10 ऑगस्टला दिवावासीयांच्या साक्षीने या चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करणार असल्याची घोषणा मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.
दिवा शहरातील प्रमुख ठिकाण असणाऱ्या दिवा चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यात यावे अशी मागणी दिवा शहरातील तमाम शिवप्रेमी जनतेकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून चौकाच्या नामकरणास दिरंगाई होत असल्याचा आरोप करत मनसेचे प्रकाश पाटील यांनी केला आहे.
बुधवारी दिवा चौक येथे भगवा झेंडा स्थापित करून येत्या 10 ऑगस्टला दिवा चौकाचे नामकरण दिवा वासीयांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली आहे. यावेळी दिवा शहरातील सर्व शिवप्रेमी जनतेने, तसेच सर्व सामाजिक संस्थांनी एकत्र यावे असे आवाहनही प्रकाश पाटील यांनी केले आहे.
चौक हे दिवा शहराचे प्रमुख व्यावसायिक आणि वाहतूकीचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणाचं नाव बदलणं म्हणजे संपूर्ण शहराच्या ओळखीला नवा दृष्टिकोन मिळवून देणे होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत लवकरात लवकर हा निर्णय घेण्याची मागणी केली आहे.स्थानिक नागरीक, व्यावसायिक संघटना, आणि तरुण मंडळांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच एक जनजागृती मोहीमही राबवण्यात येणार आहे.ही नामांतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाच्या मंजुरीची आवश्यकता असून, यासाठी मनसेचा पाठपुरावा सुरू आहे.ह्या पुढाकारामुळे दिवा परिसरात नवा उत्साह निर्माण झाला असून, हे नामांतर दिव्याच्या ओळखीचा भाग ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.