मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात (Maharashtra education And Sports Department) कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी (Working Officers And Employees) यांच्याकडे सध्या एकही संगणक (Computer), प्रिंटर (Printer) आणि स्कॅनर (Scanner) शिल्लक नसल्याची बाब उघडकीस आली आहे. या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी नवे ३० संगणक, ३० प्रिंटर आणि ३ स्कॅनर मागविण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिकारी, कर्मचारी हे जुन्याच संगणकावर काम करत आहेत. मात्र, हे संगणकही जुनाट स्थितीतील असून ते वारंवार हँग होत असून अधूनमधून बंद पडत आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाचा कारभार अधांतरी लटकला आहे. या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी नवे संगणक, प्रिंटर आणि स्कॅनर विकत घेण्याचा घाट विभागाने घेतला आहे. यासाठी निविदाही काढण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या या साहित्याला अंमलबजावणी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ३० संगणक, ३० प्रिंटर आणि ३ स्कॅनर ( २ स्कॅनर आयुक्त, शिक्षण यांच्या कार्यालयातील ई-गव्हर्नन्स सेलसाठी व १ स्कॅनर शालेय शिक्षण विभागासाठी ) खरेदी करण्यात येणार असून यासाठी ३७,५०,००० इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
सदर खर्च सर्वसाधारण शिक्षण ८० पंचवार्षिक योजनांतर्गत ई गव्हर्नन्स कार्यक्रम आणि सहाय्यक अनुदाने यामधून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी सहसचिव (प्रशासन) यांना नियंत्रक अधिकारी आणि कक्ष अधिकारी यांना संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याचा शासन निर्णय जरी करण्यात आला आहे.