मुंबईवर ड्रोन हल्ल्याचा धोका; वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क (File Photo : Police)
मुंबई : भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई नेहमीच दहशतवाद्यांचे लक्ष्य राहिली आहे. यावेळी देशविरोधी शक्तींनी २६/११ च्या धर्तीवर मुंबईतून जगात दहशत निर्माण करण्याचा एक नवीन कट रचला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांनी तसा अलर्ट जारी केला आहे. यावेळी दहशतवादी ड्रोनद्वारे मुंबईवर हल्ले करू शकतात. विशेषतः व्हीव्हीआयपी त्यांचे लक्ष्य असू शकतात.
गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यामुळे मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. लोकसभेत वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर काही ठिकाणी लोक त्याचा आनंद साजरा करत आहेत. तर अनेक मुस्लिम संघटना उघडपणे त्याचा विरोध करत आहेत. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण देशात वातावरण तणावपूर्ण आहे. याचा फायदा घेण्यासाठी देशविरोधी शक्ती कट रचत आहेत.
मुंबईतील व्हीव्हीआयपी लोकेशनसह अनेक महत्त्वाची ठिकाणे दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. गुप्तचर विभागाकडून मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, देशविरोधी शक्ती मुंबईत ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून मोठी घटना घडवून आणण्याचा कट रचत आहेत. सार्वजनिक मालमत्ता आणि गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्याचा त्यांचा कट आहे. या संदर्भात, मुंबई पोलिसांना मिळालेली सतर्क माहिती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
धार्मिक स्थळांवर कडक सुरक्षा
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईतील सर्व प्रमुख मंदिरे, मशिदी आणि धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पोलिस धार्मिक स्थळांवर विशेष लक्ष देत आहेत. त्यांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची तक्रार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवली
मुंबई पोलिसांच्या सर्व उच्च अधिकाऱ्यांना, विशेषतः पोलिस उपायुक्तांना त्यांच्या संबंधित झोनमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख हॉटेल्स, लॉज, पार्किंगची ठिकाणे, मोठे मॉल्स यांच्या आसपास पोलिसांची तपासणी वाढवण्यात आली आहे. थिएटर, मॉल आणि डी-मार्टच्या आसपासच्या तात्पुरत्या बाजारपेठा आणि आठवडी बाजारपेठांवर पोलिस बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
पोलिसांची हवाई देखरेख
मुंबई पोलिसांच्या परवानगीशिवाय शहराच्या हद्दीत ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर हँड ग्लायडर्स आणि हॉट एअर बलूनचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक किवा खाजगी कामांसाठीही ड्रोनसारख्या गोष्टी वापरण्यास पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल.