फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: तोरणगण घाटात सलग तीन वाहनांचा अपघात झाल्याची घटना दि.११ रोजी घडली असून, त्यामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. जव्हार-त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील हा घाट तीव्र वळणं आणि उतारांसाठी कुप्रसिद्ध आहे. या अपघातात एक ट्रक पलटी झाला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तरीदेखील या घटनेमुळे परिसरातील नागरिकांचा रोष वाढला आहे.
गेल्या काही वर्षांपासून तोरणगण घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. ब्रेक फेल होणे, वळणांचा योग्य अंदाज न येणे, वाहन चालकांचा ताण, तसेच प्रशासनाचा निष्काळजीपणा ही कारणं वारंवार पुढे येत आहेत. धोकादायक ठिकाणी सूचना फलकांचा, क्रॅश बॅरिअर्सचा आणि संरक्षण भिंतींचा पुरेसा अभाव आहे. चालकांना सावध करण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने वाहनचालकांना अक्षरशः जिवावर उदार होऊन घाटमार्गावर प्रवास करावा लागतो.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, तीव्र वळण आणि उतारांच्या आधी स्पष्ट सूचना फलक असणे गरजेचे आहे. काही ठिकाणी वळण दुरुस्त करून उतार कमी करणे आवश्यक आहे. याशिवाय वाहनांना थांबून विश्रांती घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे आहे. अपघात झाल्यास त्वरित मदत मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर आपत्कालीन सुविधा असणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, एवढ्या अपघातांनंतरही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. परिणामी लोकांमध्ये नाराजी वाढत आहे. तोरणगण घाटासह अन्य धोकादायक रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने रस्त्यांची पुनर्रचना करणे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करवून घेणे आणि आपत्कालीन सेवांचा वेगवान प्रतिसाद मिळवून देणे गरजेचे आहे. येत्या काळात अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी सरकार व बांधकाम विभागाने ठोस पावले उचलून नागरिकांचा विश्वास संपादन करावा, अशी मागणी घाट परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.