मराठवाड्यातही पाऊस
रांजणी : आंबेगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळपासून तालुक्याच्या पूर्व भागात ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज गायब झाल्याच्या घटना घडल्या. तर आंबा आणि भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.
तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी, वळती, थोरांदळे, चांडोली बु., नागापूर, गांजवेवाडी, जाधववाडी, लौकी आदी परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात भिजला तर अनेक ठिकाणी आंबे आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
सतत दोन ते तीन तास मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्याने ओढ्या-नाल्यांना पाण्याचा पूर आला होता. पावसामुळे अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे तापमानात देखील घट झाली असून, उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. परंतु, शुक्रवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने शेतीचे बांध फुटून अनेक ठिकाणी शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ओढ्या नाल्यांना पूर आल्याचे चित्र गेल्या दहा वर्षात यावेळी प्रथमच पाहायला मिळाले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तालुक्याच्या पूर्व भागात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
यंदा प्रथमच मान्सूनपूर्व पावसाने लावली दमदार हजेरी
आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा वर्षांत यंदा प्रथमच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने भविष्यकाळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी शेतात कांदा काढून ठेवला असून, जोरदार पावसामुळे कांदा खराब होऊ नये म्हणून शेतकरी काढलेला कांदा सुरक्षित ठेवण्याचा प्राधान्याने प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. एकूणच गेले दोन दिवस तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आगामी काळात खरिपातील कामांना वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते.
आंबा पीक धोक्यात येण्याची शक्यता
तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे यावर्षी प्रथमच शेतमाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पावसामुळे आंबा पीक धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते.