File Photo : Accident
महाड : किल्ले रायगड येथे आलेल्या पर्यटकांच्या एका खाजगी बसला अपघात झाला. ग्रामस्थांच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ऐरोली, नवी मुंबई येथून किल्ले रायगड येथे आलेल्या (एमएच 04 जेके 8282) क्रमांकाची ही खाजगी बस किल्ले रायगडकडून महाडकडे येत असताना कोंझर गावाजवळील असलेल्या पहिल्या वळणावर चालकाचा ताबा गेल्याने रस्ता सोडून काही फूट अंतरावर जाऊन उभी राहिली.
सुदैवाने गाडीत असलेले सर्व 50 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती या गाडीतील एक प्रवासी कृषिराज चव्हाण यांनी बोलताना दिली आहे. या घटनेचे वृत्त समजतात कोंझर गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गाडीमधून अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या गाडीमध्ये एकूण प्रवाशांपैकी 10 महिला व 10 लहान मुले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
ताबा सुटल्याने झाला अपघात
रस्त्यालगत गेलेल्या या जागेवर चिखल असल्याने गाडी फार दूर गेल्याची माहिती प्राप्त झाली असून, झाडाचा आधार घेत या सर्व प्रवाशांना नागरिकांनी सुखरूप गाडीतून बाहेर काढून रस्त्यावर आणण्याचे दिसून आले.
देवदर्शन करून झाला अपघात
दुपारनंतर पाली येथून देवदर्शन करून किल्ले रायगड येथे या मंडळींनी दर्शन घेतले. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास कॉझर या ठिकाणी ही बस आली असता चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या दुर्घटनेचे वृत्त समजताच महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.