आदिवासी समाजाचा मोर्चा पेणमध्ये धडकणार; 'त्या' मुलीच्या मृत्यूप्रकरणी समाज आक्रमक (संग्रहित फोटो)
कर्जत : वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत चुकीचे औषध दिल्यामुळे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आदिवासी मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेला तीन महिने उलटले, तरीही अद्याप संबंधित शासकीय आरोग्य यंत्रणेवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये असंतोषाची भावना असून, मंगळवारी पेण शहरात धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाच्या हिवताप कुष्ठरोग निर्मूलन पथकाने 16 डिसेंबरला तांबडी गावातील खुशबू ठाकरे (९) हिला कुष्ठरुग्ण ठरवून औषधे दिली. मात्र, या औषधांचा साईड इफेक्ट झाला. अंगावर फोड्या, सूज आली. त्यामुळे तिला पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करावे लागले. येथे उपचार सुरू असताना कुष्ठरोग निर्मूलन करण्याच्या गोळ्या बंद करण्यात आल्या. मात्र, उपचारादरम्यान तिचा 22 जानेवारीला मृत्यू झाला.
दरम्यान, कोणताही आजार नसतानाच चुकीचे निदान केल्यामुळे खुशबूचा बळी गेला, असा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित पवार, महिला अधिक्षक सुवर्णा वरगने यांना आधीच निलंबित केले आहे. परंतु, संबंधित आरोग्य यंत्रणेवर अद्यापही कारवाई झालेली नाही.
कामार्ली येथील आरोग्य यंत्रणेवर कारवाईची मागणी
कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक यांच्याकडून खुशबूला चुकीची औषधे दिली आहेत, असा दावा ग्राम संवर्धन समिती तसेच आदिवासी संघटनेने केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने चुकीची औषधे दिल्याने जीव गमावावा लागलेल्या खुशबूच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी 6 मे रोजी पेण शहरात मोर्चा काढला जाणार आहे.