कोल्हापुरातील सभेत उद्धव ठाकरेंनी दिली ५ मोठी आश्वासनं
शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराला आज कोल्हापुरातील राधानगरी मतदारसंघातून झाली. या प्रचारसभेत ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि महायुतीवर जोरदार हल्ला चढवताना जनतेला आश्वासनंही दिली. महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. कोरोना काळात महाराष्ट्राला देशात नंबर वनचं राज्य बनवलं होतं, याचीही त्यांनी आठवण करून देताना, तरीही सरकार पाडल्याची खंत बोलून दाखवली.
मुलांनाही मोफत शिक्षण
राज्यातील केवळ मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं. मुलगा आणि मुलगी दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुलांनाही मोफत शिक्षण दिलं जाणार आहे.
महिला अधिकारी असलेलं पोलीस ठाणे
सध्या महिलांना पोलीस ठाण्यात गेल्यावर कुठे तक्रार करायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. त्यामुळे महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेली पोलीस ठाणी उभारण्यात येतील
शेतमालाला हमीभाव
राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव दिला जाईल. महाविकास आघाडीचं सरकार पडलं नसतं तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भूमीपुत्रांना परवणाऱ्या दरात घरे
मुंबईतील धारावीतील जागा अदाणी ग्रुपला देण्यात येत आहे. अदानी ग्रुपचा प्रकल्प रद्द करुन धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे दिली जातील. मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना केलं. त्यामुळे मुंबईवर तुमचा हक्क आहे. धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमीपुत्रांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन घेऊ, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
हेही वाचा-पुरंदरमध्ये होणार तिरंगी लढत; शिवतारेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठबळ?
जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थीर ठेवणार
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. आता पुन्हा सत्ता आली की महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाहीत. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या कोरोनाचं संकट आलं. तरीही महाराष्ट्राला देशात नंबर वनचं राज्य बनवलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, महाविकास आघाडीचं सरकार पाडलं नसतं तर आज शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त झाला असता. राज्यात परकीय गुंतवणूक वाढली. मात्र या सरकारने सर्व उद्योग गुजरातला पळवले. गुजराती मराठी असा दुजाभाव नाही. पण इथल्या भूमीपुत्रांच्या हक्काचं ओरबाडून दुसऱ्या राज्यात पळवणं हा कोणता न्याय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.