फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अवघ्या काही वर्षांच्या चिमुरडीवर शाळेमध्ये झालेल्या या प्रकारामुळे तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. यामुळे राज्यात विद्यार्थीनी सुरक्षित नसल्याची भावना महाविकास आघाडीने व्यक्त केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या (दि.24) महाराष्ट्र बंद पुकारला आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीची बाजू मांडली आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ त्यांनी महाराष्ट्र बंद पुकारला असल्याचे सांगितले. तसेच हा बंद राजकीय नसून आपल्या बहीणींसाठी मुलींसाठी असल्याचे मत देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद आहे. पालकांना मुलगी शाळेत सुरक्षित आहे का. कार्यालये असतील, रुग्णालये असतील तिथे आपण सुरक्षित राहू का असं माता भगिनींना वाटतकं. या अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी बंद आहे. आजपर्यंत जसा बंद झाला, तसाच बंद असेल, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
किती वेळ असणार बंद?
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद कसा आणि किती वेळ असेल याची रुपरेषा स्पष्ट केली. पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, हा बंद सर्व नागरिकांचा असेल. यामध्ये कोणताही जात, पात, धर्माचा भेद नसेल. याच्या कक्षा ओलांडून सर्वांनी बंदमध्ये यावं. हा सामाजिक प्रश्न आहे. आजपर्यंतच्या बंदसारखाच असेल. यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील सामील व्हावे, कारण हा विकृतीच्या विरोधात बंद आहे. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत हा बंद असणार आहे. अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
कोणाला असणार सुट?
उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, उद्याचा बंड कडकडीत असणार आहे. दोन वाजेपर्यंत हा महाराष्ट्र बंद असेल. पण त्यात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. पेपर, अग्निशमन दल आरोग्य सेवा चालू राहतील. सणासुदीचे दिवस आहे. गणपती बाप्पा येत आहे. दहीहंडीचा सराव आहे. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळा. कारण उत्सव आहे. आम्ही बंदमध्ये कायदा हातात घेणार नाही. बंद म्हणजे बंद आहे. मात्र पोलिसांनी बंदच्या आड येऊ नये. शांततेमध्ये बंद करु द्यावा.
मुख्यमंत्र्यांना असणार खास सुट
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खास सूट दिली आहे. मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना एक सूट देण्यात आली आहे. ते बाकी मुख्यमंत्री रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात. कारण त्यांच्या मते बहिणी या फक्त मते देण्यासाठी आहेत. बहिणीची किंमत ही मतं आहे. पण आमच्यासाठी बहीण हे नातं आहे. आम्ही नातं जपणारी माणसं आहोत. तुम्हाला वाटत असेल बहिणीची मते विकत घेऊ शकता, तर बहीण ही विकाऊ नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.