फोटो - सोशल मीडिया
धुळे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यापूर्वी महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते तयारीला लागले आहे. दोन्ही युतीमधील घटक पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. सर्व पक्षांतील नेत्यांच्या बैठकी, सभा आणि दौरे वाढले आहेत. अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा तर शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. यानंतर आता केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी देखील महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी जैन समाजाचे गुरु आचार्य रत्न सुंदरसुरेश्वर महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आचार्य रत्न सुंदर सुरेश्वर यांचे दर्शन घेण्याचा योग आला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी सांगितले.
याबाबत योग्य कार्यवाही होईल
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती मोठ्या प्रमाणावर जागा जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या पुतळ्यात घटने प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली असून याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे.
महायुतीच विजयश्री खेचून आणेल असा विश्वास
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे. महायुतीला लोकसभा निवडणूकीमध्ये मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवडणूकीवेळी अपेक्षित असे यश न मिळाल्यामुळे महायुती आता विधानसभेसाठी जोरदार कामाला लागली आहे. पक्षांतर्गत चर्चा वाढली असून महायुतीमधील इतर नेत्यांशी देखील चर्चा होत आहे. महायुतीचा अद्याप जागावाटप फॉर्मुला समोर आलेला नाही. मात्र जो जी जागा जिंकेल त्याला ती जाईल, असे विधान अजित पवार यांनी केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अजित पवारांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. येत्या आठवड्यामध्ये महायुतीचा जागावाटप फॉर्मुला समोर येईल, असे देखील बावनकुळे म्हणाले आहेत. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी देखील महायुतीच विजयश्री खेचून आणेल असा विश्वास व्यक्त आहे.