साधारणी तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर (File Photo : Rain)
छत्रपती संभाजीनगर : गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सगळीकडे अवकाळी पाऊस सुरू आहे. रविवारी तर या पावसाने कहर केल्याने त्याचा फटका संपूर्ण जिल्ह्याला बसला. ठिकठिकाणी आंबा, फळबागा व काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले. या पावसाचा रेल्वे वाहतूक व एसटी बससेवेवर परिणाम झाला.
मुंबईवरून येणाऱ्या विमानांची सेवाही काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. रविवारी सर्वत्र पडलेल्या मुसळधार अवकाळीमुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला. जागोजागी पाणी साचल्याने लालपरीची गती मंदावली. हवामान खात्याच्या अंदाजात हा पाऊस आणखी चार ते पाच दिवस राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने विमान, रेल्वे व रापमने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब होऊन, पाणी साचले, काही ठिकाणी झाडे, विजेचे खांब पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. याचा परिणाम वाहतूक कोंडीच्या रुपाने झाला. सखल भागांत पाणी साठल्याने व झाडे रस्त्यावर पडल्याने प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली होती.
रेल्वेमार्गावरही पाणीच पाणी
छत्रपती संभाजीनगर ते नांदेड, मुंबई, मनमाडकडे जाणाऱ्या रुळांवरही पाणी साचल्याचे पाहिला मिळाले. याचा रेल्वे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याने नियमित गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे विमानसेवेवर अधिक परिणाम झाला नाही. एअर इंडिया, जेट, खासगी इंडिगोची विमाने उशिरा दाखल झाली असली तरी कोणतीही सेवा रद्द करण्यात आली नाही.