फोटो सौजन्य - Social Media
भारतीय सेनेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स महानिदेशालयाच्या वतीने ग्रुप-सी अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत LDC, फायरमॅन, स्टोअरकीपर, मशीनिष्ट, कुक, वेल्डर यांसह अनेक पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज ४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज नोंदणीकृत टपाल किंवा स्पीड पोस्टद्वारे निश्चित पत्त्यावर पाठवावा लागेल.
या भरतीसाठी उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी किमान १० वी (मॅट्रिक)/ १२ वी, तर काही पदांसाठी ITI किंवा संबंधित क्षेत्रातील बी.एस्सी. आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे इतके असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १९४ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये विविध तांत्रिक तसेच लिपिकीय पदांचा समावेश आहे. त्यापैकी लोवर डिव्हिजन क्लर्क (LDC) साठी १४ पदे, फायरमॅन साठी ४ पदे, ट्रेड्समन मेट साठी २५ पदे आणि स्टोअरकीपर साठी ७ पदे राखीव आहेत. तांत्रिक गटामध्ये मशिनिष्ट (Skilled) ४ पदे, वेल्डर (Skilled) ४ पदे, फिटर (Skilled) ३ पदे, तसेच इलेक्ट्रीशियन (Highly Skilled-II/Power) ४ पदे आणि टेलिकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II) ७ पदांचा समावेश आहे. याशिवाय कुक १ पद, वॉशरमॅन २ पदे, Upholster (Skilled) ३ पदे, इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक १ पद, Tin and Copper Smith (Skilled) १ पद आणि वेहिकल मेकॅनिक (Armed Fighting Vehicle) ४ पदे या श्रेणीतील पदे देखील उपलब्ध आहेत.
एकूणच, या भरतीत विविध तांत्रिक आणि सहाय्यक पदांची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लिखित परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. लिखित परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार पुढील टप्प्यातील ट्रेड टेस्ट/ स्किल टेस्टसाठी पात्र ठरतील. सर्व टप्प्यांमध्ये यश मिळवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. नियुक्तीसाठी उमेदवारांचे वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
अधिक माहिती
या भरतीसंबंधी सविस्तर माहिती व नियमावली रोजगार समाचार (४ ते १० ऑक्टोबर २०२५) मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत पाहता येईल. भारतीय सेनेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.