वैजापूर – गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता लांब लांबून गणपतीच्या मूर्ती आणत आहेत. शहर व परिसरात गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात उत्साहात आगमन झाले. शहरातील ५२ व परिसरातील ५६ अशा १०८ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. सकाळपासून शहरातील विविध भागांतील गणेशभक्तांनी व मंडळांनी गणरायाच्या मूर्तींची मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्रींची स्थापना केली.
वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारा गावांत एक गाव- एक गणपती संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली. त्यात पानवी खंडाळा, भग्गाव, मकरमतपूरवाडी, भिंगी, जरूळ, भऊर, जांभरगाव, लोणी, परसोडा, भिवगाव, लाख खंडाळा व आघूर या गावांचा समावेश आहे. वैजापूर येथील छत्रपती शासन या ग्रुपने अक्षरशः नंदुरबार जिल्ह्यातून गणरायाची भव्य अशी मूर्ती आणली आहे. २५० किलोमीटर ट्रकवर प्रवास करत ही साडेअठरा फूटाची मूर्ती येवला शहरात दाखल होताच सर्वांचे लक्ष वेधले.
मुंबईमध्ये सुद्धा अनेक गणपतींचे आगमन झाले आहे तर आज लालबागच्या राजाचे सुद्धा आगमन होणार आहे. लालबागचा राजाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मानले जाते. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लांबून भाविक हजेरी लावतात आणि अनेक कलाकार सुद्धा लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्याचबरोबर चिंतामणी गणपतीचे सुद्धा आगमन काही दिवसापूर्वी झाले आहे. त्यावेळी प्रचंड भाविकांनी हजेरी लावली होती आणि उत्साहात चिंतामणीच्या राजाचे आगमन झाले.