पंढरपूर : अयोध्या येथे सोमवार दि. २२ जानेवारी रोजी श्री रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होत असून त्या दिवशी श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरास विद्युत रोषणाई, फुलांची आरास, अन्नछत्रात विशेष भोजनप्रसाद, रामजप तसेच अयोध्यातील कार्यक्रम पाहता यावा, यासाठी मंदिर व मंदिर परिसरात एलईडी स्क्रिन बसविण्यात येणार असल्याची माहिती सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दि. २० रोजी रात्री विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मंदिरात व नामदेव पायरी येथे आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. यामध्ये आकर्षणाचा बिंदू नामदेव पायरीच्या बाजूला श्रीरामाची प्रतिकृती (सेल्फी पॉइंट) असणार आहे. तसेच श्री. विठ्ठल सभामंडप येथे सकाळई ९ ते दुपारी १ या दरम्यान रामजप करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात विविध देवतांची ३९ परिवार देवता मंदिरे आहेत. त्यामध्ये बाजीराव पडसाळी येथे श्री. राम मंदिर असून या मंदिरात फुलांची सजावट व विशेष नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. तसेच श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर, दर्शनमंडप व नामदेव येथे नयनरम्य लेसरद्वारे विद्युत रोषणाई तसेच मंदिर व परिसरात दिवे लावण्यात येत आहेत.
विशेष भोजनाची सोय
श्री. संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये दुपारी १२.०० वाजता विशेष भोजन प्रसादाची सोय केली असून, रामलल्लाच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून, त्या दिवसापासून अन्नछत्रातील रात्रीच्या भोजनप्रसादामध्ये चपाती व भाजीचा समावेश करण्याची सुरवात करण्यात येत आहे. अयोध्या येथील कार्यक्रम लाईव्ह पाहता यावा, यासाठी श्री विठ्ठल सभामंडप, नामदेव पायरी व पश्चिमद्वार येथे एलईडी स्क्रीन बसविण्यात येत आहेत. तसेच अयोध्यातील कार्यक्रमासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, ह.भ.प. प्रकाश जवजाळ उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी समिती कर्मचारी घेत आहेत परिश्रम
सदरचे कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे सदस्य आ. राम कदम, दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अतुल शास्त्री भगरे गुरुजी, माधवी निगडे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिर समितीचे सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.