मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूल बांधताना रस्त्याची उंची योग्य प्रमाणात ठेवण्यात आली नाही. त्यामुळे पुलालगतचा रस्ता खड्ड्यासारखा खोलगट झाला असून पावसाचे पाणी तेथे मोठ्या प्रमाणात साचत आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या गटारी (साऱ्या) व्यवस्थित बांधण्यात आल्या नसल्याने संपूर्ण पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे.
परिणामी रस्ता जलमय होत असून वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. या मार्गावर तीव्र वळण असल्याने समोरून येणारी वाहने आधीच दिसत नाहीत. त्यातच पुलालगत वाढलेल्या झाडांमुळे दृष्टीक्षेप आणखी कमी झाला आहे. अशा परिस्थितीत अचानक रस्त्यावर पाणी आल्यास वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. या परिसरात यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले असून काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील संबंधित यंत्रणेने या धोकादायक ठिकाणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
पूर्वी या ठिकाणी कमी उंचीचा पूल असल्याने पावसाळ्यात ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असे आणि पश्चिम भागातील गावांचा संपर्क काही काळ विस्कळीत होत असे. ही समस्या कायमची दूर व्हावी म्हणून नवीन पूल उभारण्यात आला. मात्र पुलाची उंची वाढवली असली तरी रस्त्याचे योग्य लेव्हलिंग, पाण्याचा निचरा, संरक्षण भिंती आणि बाजूंची मजबुतीकरणाची कामे दर्जेदार पद्धतीने न झाल्याने आजही नागरिकांना त्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आगामी काळात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता या मार्गावरील वाहतुकीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची पाहणी करून रस्त्याची उंची दुरुस्त करणे, पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य गटारी बांधणे, रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत उभारणे, खचलेले भाग दुरुस्त करणे, झाडांची छाटणी करणे आणि इशारा फलक लावणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
Satara News : वाई मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, नगरपालिकेची बंदिस्त गटारे योजना सपशेल फेल






