आर्वी न्यायालय (Photo - Social Media)
Wardha News : न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपीने अचानक न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकल्याची धक्कादायक घटना आर्वी येथे घडली. गुरुवारी दुपारी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान आर्वी येथील न्यायालय क्रमांक २ मध्ये ही घटना घडताच मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी आर्वी न्यायालयाचे सह अधीक्षक शैलेश अंबुलकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी कदीर अली रज्जाक अली (४४, रा. काकडधरा) याच्याविरुद्ध आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी दुपारी आर्वीच्या न्यायालय क्र. २ मध्ये न्यायाधीश एन. जे. देशमुख यांच्यासमोर तळेगाव पोलिसांनी आरोपी कदीर अली याला हजर केले होते. त्यावेळी तळेगाव श्यामजीपंत ठाण्याच्या पीएसआय धनश्री सगणे, पोलिस कर्मचारी श्रीकांत नायकवाडे, अतुल अडसड हेदेखील उपस्थित होते. न्यायाधीशांनी नाव विचारले असता आरोपीने आपले नाव सांगितले. त्यानंतर एक-दोन प्रश्नही विचारण्यात आले. त्यानंतर आरोपीने खिशातून एक कागद काढून खाली टाकला. तो कागद उचलण्यासाठी खाली वाकला आणि अचानक आपल्या पायातील चप्पल काढून न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली.
चप्पल तेथे उपस्थित असलेले सरकारी वकील के. व्ही. वेरूळकर यांना लागली. पोलिस आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याने दुसरी चप्पलही त्याच दिशेने डायसकडे फेकली, जी पंख्याला लागून न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर जाऊन पडली. ही घटना घडताच न्यायालयाच्या कक्षात एकच खळबळ उडाली. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
उल्लेखनीय असे की, आरोपी कदीर अली रज्जाक अली याने यापूर्वी महिला डॉक्टरला थापड मारल्याची घटना समोर आली होती. २१ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी तळेगाव-श्यामजीपंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. तेथे त्याने महिला डॉक्टरला थापड मारली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेची चर्चा थांबते न थांबते तोच आर्वी न्यायालयात चप्पल फेकल्याची घटना समोर आल्याने पोलिसांच्या उपस्थितीत दोन वेळा अशा प्रकारचे वर्तन आरोपीकडून झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Wardha News : रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप; वर्ध्यातील प्रकरणात नागपूर खंडपीठाचे निर्देश
Ans: गुरुवारी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास आर्वी येथील न्यायालय क्रमांक २ मध्ये ही घटना घडली.
Ans: कदीर अली रज्जाक अली (वय ४४, रा. काकडधरा) असे आरोपीचे नाव आहे.
Ans: न्यायालयाचे सह अधीक्षक शैलेश अंबुलकर यांच्या तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.






