Nitesh Rane visit Washim
वाशिम: दुष्काळसदृश परिस्थितीत जलाशय व तलावातील पाणीसाठा कमी असून मत्स्य व्यवसायापुढे संकट निर्माण झाले आहे. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा असून त्यानुसार प्रत्येक नुकसानाची नोंद घेऊन मत्स्य व्यावसायिक बांधवांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी आज येथे केले.
दुष्काळ सदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाली त्यावेळी ते बोलत होते. आ. भावना गवळी, आ. सई डहाके, आ. श्याम खोडे, आ. बाबुसिंग महाराज राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मत्स्य व्यवसाय आयुक्त भानुदास पालव, प्रादेशिक उपायुक्त सु. वा. जांभुळे, सहाय्यक आयुक्त प्रियंका झोड आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा मासे उत्पादनात मोठी घट होणार आहे. मत्स्य व्यवसायिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. जलाशयांमध्ये गाळ साचल्याने त्यांची क्षमता कमी होते. त्यामुळे जलाशयांमधील गाळ काढण्यासाठी राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येईल. जलाशयातील शेतीसाठी वापरता येणार आहे व जलाशये मोकळी झाल्यामुळे भविष्यात साठवण क्षमता वाढणार आहे. संबंधित यंत्रणांनी यासंबंधीचे प्रस्ताव दोन आठवड्यात शासनाकडे परिपूर्ण करून पाठवावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी जलसंधारण, पाटबंधारे, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.






