Washim Dam Water Shortage
वाशिम: जिल्ह्यात आगामीकाळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. लघु व मध्यम प्रकल्पांमधील जलसाठ्याने आतापासूनच तळ गाठल्याने जलसंकट अधिक गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील सरकारी जागेत काढण्यात आलेले अवैध बोरवेल प्रशासनाने वेळीच अधिग्रहित (ताब्यात) करून नागरिकांसाठी आणि टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगात आणावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. विशेषतः हायवे लगत असलेले हे बोरवेल पाणीटंचाईच्या काळात तारणहार ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार, वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती चिंताजनक बनली आहे. वाशिम तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या ३७.५९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. मालेगाव येथील सोनल प्रकल्पात केवळ २२.१६ टक्के पाणीसाठा उरला आहे. जिल्हयातील एकूण ७५ लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून सध्या सरासरी केवळ ३२,४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यापैकी तब्बल ९ प्रकल्पांमधील पाणीसाठा चक्क टक्क्यांवर (तळाला) पोहोचला आहे.
गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भूगर्भाची पातळी सुधारली होती. मात्र वाढत्या उन्हाळा आणि तीव बाष्पीभवन यामुळे जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. परिणामी, अनेक भागांत आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली असून काही ठिकाणी १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे, तर ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे.
जिल्ह्यातील ही बिकट पाणीस्थिती आगामी काळात प्रशासनासाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठकांचे सत्र सुरू असले, तरी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारी जागेतील अवैध बोरवेल प्रशासनाने ताब्यात घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी वापरणे गरजेचे बनले आहे. तसेच, सार्वजनिक जलस्रोतांमधून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली.






