टेमघर पाणीगळती रोखण्यासाठी ४८८ कोटींच्या खर्चाला मान्यता (File Photo : Temghar Dam)
पुणे : टेमघर धरणातून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी 488 कोटी 53 लाख रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली आहे. मात्र, अवघ्या महिनाभरावर पावसाळा सुरू होत असल्याने पाणी गळती रोखण्याचे काम हे दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे.
टेमघर धरणातील गळती रोखण्यासाठी जून 2020 पर्यंत अत्यावश्यक कामे करण्यासाठी राज्य सरकारने 323 कोटी रुपयांच्या निधीला यापूर्वी मान्यता दिली होती. मात्र, भूसंपादन व धरणाची अन्य कामेही करणे आवश्यक असल्याने खर्च वाढला. धरणाच्या कामात भूसंपादन करण्यात आले, पण या भूसंपादनासंदर्भात न्यायालयातही काही प्रकरणे प्रलंबित होती. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मोबदलादेखील शेतकऱ्यांना देण्यात आला. परिणामी, या कामांचा खर्च सुमारे 488 कोटींपर्यंत पोचला. मात्र, मंजूर खर्चापेक्षा उर्वरित निधीला मान्यता नसल्याने ही बिले जलसंपदा विभागाकडून मंजूर करता येत नव्हती.
राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी 488 कोटी 53 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिल्याने आता या बिलांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकीत टेमघर धरणातील पाणीगळती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामांसाठी अतिरिक्त 315 कोटी 5 लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मान्यता दिली आहे. या संदर्भात अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्वाचे असे टेमघर धरण तातडीने दुरुस्त करण्याची पावले उचलण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. पुण्याच्या काही भागात वसलेले हे धरण पुणे महानगरासाठी धोकायदायक ठरू शकेल असा इशारा तज्ज्ञ समित्यांनी वेळोवेळी दिला होता. त्यानंतर आता या धरणाची गळती रोखली जाणार आहे. याचा फायदा धरणक्षेत्राला होणार आहे.