गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागातील तापमान चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर गेले. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची काहीही होतेय. तर दुसरीकडे मुंबई आणि ठाणेकरांची अजून उष्णतेपासून सुटका मिळालेली नाही. तापमानाचा ताप या भागाती नागरिकांना करावा लागतो. त्यातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतो. पुढील काही दिवस या उष्णतेचा त्रास होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ताशी 35 ते 40 किमी वेगाने उष्ण वारे गुजरातमध्ये वाहत आहे. दक्षिणोत्तर हवेच्या निर्वात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वारे महाराष्ट्रात देखील येत आहे. परिणामी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकण, किनारपट्टी, सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचे संकेत देण्यात आली आहे.
उष्णता का वाढतेय?
मार्च ते मे या तीन महिन्यांच्या मान्सूनपूर्व गोंधळामुळे महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेनुसार वातावरणात बरेच बदल होत आहे. तसेच कोकणपट्टीच्या खाऱ्या समुद्राचा खारा वारा कोकणपट्टीतील अधिवासासाठी दररोज आदळतो. दिवसा आणि रात्री वाऱ्याची दिशा वेगळी असते. याचदरम्यान पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि राजस्थानच्या भागातून उच्च दाबाची प्रणाली झाली तर वायव्य दिशेकडून गुजरात, अरबी समुद्रावरुन वारे, उष्णता घेऊन मुंबईसह संपूर्ण कोकणात सह्याद्रीवर अडकून आदळतात. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर तसेच कोकणात जाणवणाऱ्या उष्णतेच्या लाट जाणवत आहे.
कुठे पाऊस तर कुठे उष्णता
एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. काही ठिकाणी घरांवरील पत्रेही उडून गेली आहेत. हवामान खात्याने गुरुवारपासून (२२ मे) पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.