File Photo : Vinod Tawde
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी एक दिवस मुंबईत मोठा राडा पहायला मिळाला. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणाऱ्या विनोद तावडेंवर विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मतदानाआधी घडलेल्या या प्रकारामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेले विनोद तावडे यांची अचानक राज्याच्या राजकारणात पु्न्हा एन्ट्री का झाली? देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला त्यांच्यापासून धोका आहे का? कशी आहे विनोद तावडे यांची राजकीय कारकीर्द आणि पक्षातील स्थान, जाणून घेऊया एका रिपोर्टमधून..
राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास चार दशकाहून सक्रिय असलेल्या विनोद तावडे यांचा जन्म 20 जुलै 1963 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविप या भाजपच्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नते प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांच्या तालमीत ते वाढले. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) 1980 मध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1988 मध्ये ते ABVP चे सरचिटणीस बनले. याकाळात त्यांचा अनेक विद्यार्थी आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग होता.
विनोद तावडे 1994 मध्ये भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले आणि वर्षभरातच त्यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. १९९९ मध्ये चार वर्षांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष बनले. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी कमी वया विराजमान होणारे ते पहिले नेते ठरले होते. जवळपास ९ वर्षांनी २००८ मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार बनले. तर २०११ मध्ये विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते झाले.
२०१४ मध्ये केंद्रात भाजपची एक हाती सत्ता आली. त्यानंतर लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत विनोद तावडे यांना भाजपने बोरिवली विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आणि त्यांनी विधानसभेत पाहिल्यांदा प्रवेश केला. मंत्रिमंडळात त्यांना शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण ही खाती सोपावण्यात आली. 2019 मध्ये मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे तावडेंचं राजकीय करिअर पणाला लागलं होतं. पण पक्षाने त्यांना 2020 मध्ये त्यांना राष्ट्रीय सचिव पद दिलं आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी सरचिटणीसपदी वर्णी लागली. त्यानंतर हरियाणाचे प्रभारी, बिहारसारखं महत्त्वाचं राज्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबादारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात त्यांचा दबदबा वाढला.
महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्यात भाजपचा प्रमुख चेहरा बनले होते. त्यात विनोद तावडे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेते शिवाय राजकीय जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झालेली. भाजपच्या जुन्या फळीतले किंवा जुन्या नेत्यांच्या तालमीत वाढलेले. त्यामुळे दोघांमधला संघर्ष फार काळ लपून राहिला नाही. २०१९ मध्ये तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी कधीही उघड नाराजी व्यक्त केली नाही. राज्यात पुन्हा कुठेही अंतर्गत गटबाजी किंवा हालचाली न करता त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन केला.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विनोद तावडे यांनी उघडपणे गृहमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र त्यांच्याकडे शालेय शिक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे ते नाराज असल्याची त्यावेळी चर्चा होती. मात्र २०१९ पर्यंत येता येता त्यांच्याकडील इतर खातीही कमी घेण्यात आली होती. तावडेंकडे असलेलं वैद्यकीय शिक्षणमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील गिरीश महाजन यांना देण्यात आलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि तावडे यांच्यात संघर्ष सुरू असल्याचंही बोललं जात होतं. २०१९ मध्ये ज्यावेळी तिकीट कापण्यात आलं, त्यामागे देवेंद्र फडणवीस याचा हात असल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर ते दिल्लीत राष्ट्रीय राजकाणात व्यस्त होते.
मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान विनोद तावडे यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं. त्यानंतर गेल्या महिनाभरात ते प्रचार आणि काही माध्यमांमध्येही पक्षाची भूमिका मांडताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रात महायुतीला मोठं अपयश आलं. त्यांचं खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडण्यात येत होतं. शिवाय मराठा आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचला होता. त्याच दरम्यान विनोद तावडे यांचं नाव राज्यात चर्चेत येत राहिलं. त्यामुळे जर महायुतीचं सरकार राज्यात आलं तर देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आता राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे आणि त्यानंतर २३ रोजी निकाल. त्यामुळे राज्यात कोणाची सत्ता येणार आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार की विनोद तावडे यांना, हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.