शिरोळमध्ये राजकारण रंगणार; निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारणार?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या बालेकिल्ल्यातील या निवडणुकीत स्वाभिमानीचा उमेदवार देणार की शेट्टी स्वतः निवडणूक लढवणार याबाबतही सस्पेन्स आहे. तरीही स्वाभिमानी संघटनेचा उमेदवार नक्कीच या रिंगणात असणार हे निश्चित मानले जात आहे
Photo Credit- Social Media (शिरोळमध्ये निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारणार?)
Follow Us:
Follow Us:
सुरेश कांबळे, शिरोळ: सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, शिरोळ तालुक्यातही निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. अंतर्गत प्रचाराने जोर धरला आहे. जाहीर सभा भेटीगाठी व संभाव्य उमेदवारांच्याकडून भर दिला जात आहे. तालुक्यातील विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र पाटील, यड्रावकर हे निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या विकासकामांचे डोंगर आणि लोकप्रियता हा त्यांचा मुख्य आधार आहे. डॉ. यड्रावकर हे तालुक्याच्या विकासासाठी विशेष योगदान दिल्याचे मत मतदारांमध्ये आहे, त्यामुळे ते पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे, उद्यानपंडित म्हणून ओळखले जाणारे दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे या दोन दिग्गज नेत्यांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणपतराव पाटील यांची सामजिक, कृषी, औद्योगिक क्षेत्रातील प्रभावी कामगिरी त्यांच्यासाठी मोठा फायदा ठरू शकतो. शिवाय त्यांचा मोठा गट शिरोळ तालुक्यात आहे त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे त्यांनी काँग्रेस पक्षाकडे महाविकास आघाडीची उमेदवारी मागितली आहे.
या दोघांव्यतिरिक्तही शिरोळ तालुक्यातील राजकारण रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने तालुक्याच्या जागेवर शिवसेना की काँग्रेस उमेदवार उभा करणार याबद्दल अनिश्चितता आहे. यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांचे नावही चर्चेत आले आहे. त्यांनीही अंतर्गत प्रचाराला सुरुवात केली असून वरिष्ठांच्या भेटीसाठी घेऊन उमेदवारी आपल्याला मिळावा असा जोरदार प्रयत्न करीत आहेत.
भाजपाच्या गोटातही हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांचे नावही भाजपाच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. त्यांच्या पोस्टरची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या गटाचा उमेदवार कोण असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता त्यांची भूमिका अजून महायुती की अपक्ष हे ठरलेले नाही त्यातच त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांनी राजश्री शाहू आघाडी स्थापन करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या बालेकिल्ल्यातील या निवडणुकीत स्वाभिमानीचा उमेदवार देणार की शेट्टी स्वतः निवडणूक लढवणार याबाबतही सस्पेन्स आहे. तरीही स्वाभिमानी संघटनेचा उमेदवार नक्कीच या रिंगणात असणार हे निश्चित मानले जात आहे. स्वाभिमानीने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात तिसरी आघाडी स्थापन झाल्याने आघाडी मार्फत स्वाभिमानीला उमेदवारी मिळते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
या सर्व उमेदवारांच्या संभाव्य सहभागामुळे शिरोळ तालुक्यातील विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. प्रत्येक उमेदवाराचे कार्यक्षेत्र, मतदारांवरील प्रभाव, आणि राजकीय समीकरणं हे या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.
Web Title: Who will win the election in shirol nras