लाडक्या बहिणींच्या अडचणी थांबता थांबेना; कधी इंटरनेट तर कधी OTP च येईना (File Photo : Server Problem)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना अर्थसहाय्य दिले जात आहे. पण, आता लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेबसाईटवर वारंवार एरर येत असून, ओटीपी येत नसल्याने लाडक्या बहिणींच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ई-केवायसीच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांची राज्य सरकारने पडताळणी सुरू केली आहे. यासाठी राज्यभरातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली. आता केवायसीसाठी २ महिन्यांची मुदत शासनाने दिली आहे. यात ई-केवायसी करण्याची प्रत्येक स्तर सविस्तरपणे सांगितला जात आहे. मात्र, वेबसाईट सुरळीत चालत नसल्याच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत. ई-केवायसीच्या वेबसाईटवर क्लिक केल्यावर त्याला सुरू व्हायला खूप विलंब लागतो. कसेतरी सुरू झाले तर साईटवरून ओटीपी येत नाही. त्यामुळे अनेक महिला तासनतास आपल्याजवळ मोबाईल घेऊन ओटीपीची वाट बघत बसतात. त्यामुळे लाडक्या बहिणींची गैरसोय होत आहे.
लाभार्थी बहिणीच्या मोबाईलवर ओटीपी आलाच तर तो ओटीपी टाकायचा कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ओटीपी टाकण्यासाठी संकेतस्थळावर कोणताही बॉक्स उपलब्ध नाही. यामुळे लाडक्या बहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तांत्रिक अडचणींचा वारंवार येतोय व्यत्यय
महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करण्यास विलंब लागत आहे. ई-केवायसी प्रक्रिया करताना ओटीपी येत नसल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात समोर येत असून, या समस्या सोडवून ही प्रक्रिया सुलभ करावी आणि ई-केवायसीची तारीख वाढवावी, अशी मागणी लाडक्या बहिणीकडून केली जात आहे.
महिला वर्गाची नाराजी
ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांना कनेक्टिव्हिटीच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. हे संकेतस्थळ दिवसा चालत नसून रात्रीच चालत असल्यामुळे लाडक्या बहिणी रात्रभर जागून काढत आहेत. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी महिलांकडून केल्या जात आहेत.
हेदेखील वाचा : Majhi Ladki Bahin Yojna: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर हप्ता जमा होण्यास सुरुवात