संग्रहित फोटो
कोल्हापूर : कसबा बावड्यातील यात्रेच्या कार्यक्रमावेळी नृत्यांगणास गुलाबाचे फुल देण्याच्या कारणावरून एका तरुणास मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गाेंधळामुळे कार्यक्रमावर पाणी फिरले आहे. कसबा बावड्यात लावणीच्या कार्यक्रमात झालेली हाणामारी चर्चेचा विषय झाला आहे. कसबा बावड्यात लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात लावणी सादर करणाऱ्या नृत्यांगनाला गुलाब देण्याच्या कारणावरून हाणामारी झाली.
कसबा बावड्यात यात्रेच्या निमित्ताने लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहारदार गाण्यावर लावणी कार्यक्रम होत असल्याने महिला वर्गाची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. लावणीच्या कार्यक्रमात तरुणाई बेधुंद होऊ लागली. कार्यक्रम सुरु असतानाच लावणी सादर करणाऱ्या तरुणीने केलेल्या हावभावामुळे तरुणाई अधिकच बेभान झाली. यातच काहींनी लावणी सादर करणाऱ्या तरुणीला गुलाब देण्याचा आणि आपल्या आवडीच्या गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह केला. त्यातून वादाची ठिणगी पडली.
शाहूपुरी पोलिसांनी केला हस्तक्षेप
विरोधी गटातील तरुणांनी संबंधित तरुणांना व्यासपीठाच्या मागे नेले आणि चांगलाच चोप दिला. हा सगळा प्रकार सुरू असताना शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम बंद पाडला. या लावणीच्या कार्यक्रमाला महिला वर्गाची देखील उपस्थिती लक्षणीय होती. मात्र, झालेला वाद आणि हुल्लडबाजी यामुळे महिलांनी देखील नाराजी व्यक्त केली.