Exclusive: अभिनेत्री सोनाली पंडितशी खास गप्पा
कोणतीही भूमिका स्वीकारल्यानंतर प्रेक्षकांना या भूमिकेत हीच व्यक्ती योग्य आहे असं वाटणं म्हणजे उत्तम अभिनय आणि तब्बल १० वर्षांनी मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री सोनाली पंडितच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हीच भावना येते. भूमिका कोणतीही असो ती अगदी चपखलरित्या सोनाली साकारताना दिसते. कलर्स मराठीवर सुरू झालेल्या ‘मोहिनी’ या नव्या मालिकेतून सोनाली पंडित आता प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा येते आहे.
गेल्या काही वर्षांपासून सोनाली हिंदी मालिकांमध्ये काम करतच होती. पण आता पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला या मालिकेतून सोनाली पंडित आली आहे आणि यासाठीच आम्ही तिच्याशी अगदी मनसोक्त गप्पा मारल्या, सोनालीनेही अगदी मनापासून उत्तरं देत नवराष्ट्रशी मनमोकळेपणाने आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्या.
तब्बल १० वर्षानंतर मराठीत काम करताना कसं वाटतंय? इतकी वर्ष मराठी चित्रपट/मालिकांपासून दूर का राहिलीस?
हा प्रश्न विचारल्यावर क्षणाचीही उसंत न घेता सोनालीने म्हटलं, ‘अगदी आपलंसं वाटतंय. 2015 मध्ये मराठी नाटक केलं आणि त्यानंतर माझ्याकडे मराठीत काम करण्यासाठी कोणते प्रोजेक्ट आलेच नाहीत. हिंदी प्रोजेक्ट खूप मिळाले आणि मालिका पण अशा होत्या की ज्या २-३ वर्ष सतत चालू होत्या. पण कुठेतरी खरंच काय वाटतं सांगू का? अनेकांनी मी हिंदीत काम करत आहे त्यामुळे ‘मराठीत काम करशील का?’ हा प्रश्नच विचारला नाही, तशी तसदीच घेतली नाही आणि त्यामुळे असेल कदाचित जी कामं मिळत गेली त्यात मी रमत गेले आणि मराठीत परत यायला १० वर्ष लागली. पण हिंदीत काम करते आहे म्हणून मराठीत कामच करायचं नाही असं काहीच ठरवून केलं नाही’
‘मोहिनी ही मालिका का निवडलीस आणि ही भूमिका निवडताना काय विचार केलास?’
असं जेव्हा सोनालीला विचारलं तेव्हा सोनाली म्हणाली की, ‘खरं तर मंजिरी भावे आणि मी अनेक वर्ष मैत्रिणी आहोत आणि तिने मराठी मालिका करायला आवडेल का विचारल्यावर मी नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. यानंतर वैभव चिंचाळकरचा फोन आला. शालिनीची भूमिका कशी आहे ते त्याने सांगितलं आणि ती भूमिका वेगळी असून एक कलाकार म्हणून बरंच काही करण्याचा वाव मला त्यामध्ये आहे हे मला कळलं.’
इतकंच नाही तर गंमतीने सोनालीने सांगितलं की, ‘मंजिरी जसं मला नेहमी म्हणते की जशी मी खऱ्या आयुष्यात नाही तशी शालिनी आहे आणि हेच माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. शालिनी ही अत्यंत सोशिक असून मालिकेत तिचं पूर्वायुष्य आणि सध्याचं आयुष्य दाखवायचं आहे, अनेक कंगोरे आहेत आणि हे करताना मजा येत आहे आणि म्हणूनच ही मालिका मी स्वीकारली’
‘मोहिनी’ मालिकेची स्टारकास्ट खूपच भक्कम आहे आणि त्याशिवाय अनेक Gen Z कलाकाराही यामध्ये आहेत, तर तुझा अनुभव कसा होता?
हे ऐकताच सोनाली म्हणाली की, ‘मी पटकन मिक्स खरं तर होत नाही. सुरूवातील थोडं बॅकफूटवर होते पण जसजसं काम करायला सुरूवात केली तसं आता खूपच भारी वाटतंय. माझ्याबरोबर काम करणाऱ्या मुली या जितक्या अभ्यासू आहेत, तितक्याच मस्तीखोर आहेत, त्यामुळे सेटवर धमाल येत आहे. सर्वात महत्त्वाचं उत्तम टीम असेल तर कामही उत्तम होतं आणि मोहिनी या मालिकेच संपूर्ण टीम उत्तम आहे, अशी टीम मिळायला नशीब लागतं.’
प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया मिळत आहे आणि तुझ्या प्रेक्षकांकडून काय अपेक्षा आहेत?
यावर सोनाली पटकन म्हणाली, ‘मालिका सुरू होऊन ३-४ दिवसच झाले आहेत पण मला मस्त प्रतिक्रिया मिळत आहे. नुकतीच एका ठिकाणी जेवायला गेले असता तुम्हाला आम्ही मोहिनी मालिकेत पाहिलं असं आवर्जून एकाने सांगितलं आणि फारच बरं वाटलं आणि प्रेक्षकांचं म्हणाल तर मला असं वाटतं त्यांनी कलाकारांच्याबाबत Biased राहू नये. प्रत्येक कलाकराची वेगवेगळी भूमिका करण्याची हौस असते आणि आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक अभिनयाची बाजू दाखवायची इच्छा असते. त्यामुळे प्रेक्षकांनी मला प्रत्येक भूमिकेत स्वीकारावं आणि माझ्या प्रयत्नांना नक्की यश द्या इतकीच विनंती’
सोनालीची ही शालिनीची भूमिकादेखील तितकीच गाजेल असंच तिच्या चाहत्यांना वाटत आहे. याशिवाय तिच्या अन्य भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी असून मालिका जशी पुढे सरकेल त्याप्रमाणे सोनालीच्या भूमिकेचे कंगोरे उलगडत जातील हे नक्की!






