फोटो सौजन्य - Social Media
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आपल्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच गोपनीयता राखते. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. 26 मार्च 2025 रोजी मुंबईत ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला बसने धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ एका पापाराझीच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला, ज्यामुळे काही काळ रस्त्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या राय बच्चनची कार मुंबईतील एका व्यस्त रस्त्यावरून जात असताना ही घटना घडली. तिच्या कारला अचानक एका मोठ्या लाल बसने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही, तसेच ऐश्वर्याच्या कारलाही मोठे नुकसान झाले नाही. मात्र, अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
अपघात होताच ऐश्वर्याचे बॉडीगार्ड तातडीने कारमधून उतरले आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. पापाराझींकडून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर होताच तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
या अपघाताच्या वेळी ऐश्वर्या राय बच्चन स्वतः गाडीत नव्हती किंवा ती जवळही दिसली नाही. मात्र, तिचा ड्रायव्हर तिथे उपस्थित होता. अपघातानंतर ड्रायव्हर गाडीतून बाहेर येऊन नुकसान कितपत झाले आहे हे तपासत होता. थोड्या वेळाने दोन्ही वाहने आपापल्या मार्गाने पुढे गेली. ऐश्वर्या राय बच्चनच्या सर्व गाड्यांच्या नंबर प्लेटवर ‘5050’ हा विशेष क्रमांक असतो. याच वैशिष्ट्यामुळे पापाराझींना तिचे वाहन पटकन ओळखता आले. तिच्या लक्झरी कारची किंमत जवळपास ₹1.30 कोटी असल्याचे सांगितले जाते. या कारमध्ये अत्याधुनिक सुरक्षा आणि आलिशान सुविधा आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऐश्वर्याच्या चाहत्यांनी तिच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. अनेकांनी कमेंट करून ती सुखरूप असल्याची खात्री करण्याची मागणी केली. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये ऐश्वर्या राय बच्चनसोबतच अक्षय कुमार, संजय कपूर, अजय देवगण, राकेश रोशन आणि अभिषेक बच्चन यांच्याही अशा महागड्या आणि आलिशान कार आहेत.