गेल्या काही दिवसांपासून अनेक चित्रपटांमुळे वाद सुरु आहेत. अशातच ‘72 हूरें’(72 Hoorain) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून नवीन वाद सुरु झाला आहे. या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेते रशीद नाज (Rasheed Naaz) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपटामध्ये दिसल्याने हा वाद आणखी वाढला आहे. यासंदर्भात आता मनसे (MNS) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी देखील ट्विट केले आहे.
अमेय खोपकर आणि मनसे पूर्वीपासून भारतीय चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी काम करण्याच्या विरोधात आहेत. त्यांनी पुन्हा हा विरोध करत निर्मात्यांना ताकीद दिली आहे.
भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच
फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम…— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 30, 2023
अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे याची आठवण करुन देतोय. पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सिरीजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ. त्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित निर्मात्यांची राहील.”
यापूर्वी फवाद खान या पाकिस्तानी अभिनेत्यावरून वाद झाला होता. फवाद ‘ए-दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये दिसणार होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते. तेव्हा मनसेच्या मागणीनंतर कारण जोहरने चित्रपटामध्ये फवादचे सीन काढून टाकले होते. या चित्रपटादरम्यान पाकिस्तानच्या भारताविरोधात वाढलेल्या कारवायांमुळे फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांना विरोध सहन करावा लागला.
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने 2019 मध्ये चित्रपट उद्योगात काम करणार्या पाकिस्तानी कलाकारांवर संपूर्ण बंदी जाहीर केली होती. मात्र तरीही काही निर्माते त्यांना संधी देत असल्याचं समोर येत आहे.