(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लवकरच आई होणार असून, त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नन्सीची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. पती विवेक दहिया सोबत बेबी बंप फ्लॉन्ट करत या जोडप्यांनी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. तसेच त्यांनी नव्या यूट्यूब चॅनलचीही घोषणा केली होती.
दरम्यान, आता त्यांच्या गोदभराईचा सोहळा पार पडला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिव्यांकाने स्वतः हे फोटो शेअर केले नसले तरी, त्यांची मैत्रीण आणि अभिनेत्री किरण गिरीने या समारंभाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. किरणने हा सरप्राइज कार्यक्रम आपल्या घरी आयोजित केला होता, ज्यामध्ये तिचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. विशेष म्हणजे, दिव्यांकाच्या वतीने होणारा अधिकृत डोहाळेजेवण समारंभ अद्याप बाकी असून, त्याचीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
दिव्यांका त्रिपाठीचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम
फोटोंमध्ये दिव्यांका त्रिपाठीने ‘मॉम-टू-बी’ असा सॅश परिधान केला असून बॅकग्राउंडही आकर्षक सजवलेले दिसत आहे. समोरच्या टेबलवर दोन केक ठेवलेले आहेत, त्यापैकी एका केकवर दिव्यांका आणि विवेक यांचा फोटो छापलेला आहे, तर दुसऱ्या केकवर टेडी बेअरची डिझाइन आहे.
या वेळी केसात गजरा घातलेली दिव्यांका कॅमेऱ्यासमोर बेबी बंप दाखवत हसत पोझ देताना दिसली आहे, तर विवेकही तिच्यासोबत दिसत आहेत. या शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “दिव्यांका आणि विवेकसाठी मी खूप उत्साहित आहे. ते आयुष्यातील नव्या टप्प्यात प्रवेश करत आहेत. त्यांच्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”
दिव्यांका त्रिपाठी आणि किरण गिरी यांनी २००६ मध्ये प्रसारित झालेल्या ‘बानू मैं तेरी दुल्हन’ या टीव्ही मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेत दिव्यांका शरद मल्होत्राच्या विरुद्ध भूमिकेत दिसली होती, तसेच काम्या पंजाबीनेही एका महत्त्वाच्या भूमिकेत काम केले होते. लग्नाच्या १० वर्षांनंतर, या जोडप्याने १९ मार्च रोजी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली. त्यांनी एक सुंदर मॅटर्निटी फोटोशूट केले, ज्यावर प्रेमाचा वर्षाव झाला.
दिव्यांका त्रिपाठी सहा महिन्यांची प्रेग्नेंट
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांची पहिली भेट ‘ये है मोहब्बतें’ च्या सेटवर झाली होती. याच ठिकाणी त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली, ज्याचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर त्यांनी लग्न केले. अभिनेत्रीने आपल्या प्रेग्नन्सीबद्दल सर्वात आधी पतीला माहिती दिली होती. विकी लालवाणी यांच्याशी झालेल्या संभाषणात तिने सांगितले की ती 6 महिन्यांची गर्भवती आहे आणि जून महिन्यात मुंबईत तिची डिलिव्हरी होणार आहे. ही आनंदाची बातमी तिने सहा महिने गुप्त ठेवली होती आणि त्यात ती यशस्वीही ठरली.






