(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला ‘लॉक अप २’ हा रिॲलिटी शो सुरुवातीच्या काही आठवड्यांतच वाद आणि खळबळजनक विधानांचे केंद्र बनला आहे. फराह खान आणि रितेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केलेल्या या शोमध्ये एकूण १५ स्पर्धक आहेत. पहिल्याच एपिसोडपासून राम कपूर, आकांक्षा चमोला, शिवांगी जोशी आणि सुनीता आहुजा यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक रहस्ये उघड करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, शोच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये नातेसंबंध आणि फसवणुकीशी संबंधित एका घटनेमुळे सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
शो दरम्यान, स्पर्धक श्रेया कालराने राम कपूर यांना एक गंभीर प्रश्न विचारला: जर लग्न किंवा नात्यामध्ये एखाद्याचा विश्वासघात झाला, तर त्यांनी आपल्या जोडीदाराला सोडून पुढे जायला हवे का? यावर आपले मत व्यक्त करताना राम कपूर म्हणाले की, विश्वास तुटल्यानंतर नाते वाचवणे अत्यंत कठीण असते, पण विश्वासघाताबाबतच्या त्यांच्या युक्तिवादाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. राम कपूर म्हणाले, “लग्न टिकवणे सोपे काम नाही; त्यासाठी दररोज कठोर परिश्रम घ्यावे लागतात. आयुष्यातील कठीण काळात जर कोणी चूक केली आणि तुम्हाला तुमच्या मुलांचे व कुटुंबाचे भविष्य वाचवायचे असेल, तर वेळेनुसार गोष्टी सुधारता येतात. प्रत्येक चुकीमुळे नाते संपलेच पाहिजे असे नाही. शेवटी, माणसे कधीकधी चुका करतातच.”
राम कपूर यांनी विवाहबाह्य संबंधांना चूक म्हटले, हे तिथे उपस्थित असलेल्या आकांक्षा चमोलाला अजिबात आवडले नाही आणि ती संतापली. तिने राम कपूर यांना मध्येच थांबवून सर्वांसमोर त्यांची कानउघाडणी केली. आकांक्षा अत्यंत कठोर स्वरात म्हणाली, “सर, ही काही अपघाताने घडणारी गोष्ट नाही. अनोळखी व्यक्तीसोबत जवळीक साधणे ही एक संपूर्ण प्रक्रिया आहे. तुम्हाला समोरचे कपडे काढावे लागतात, तुम्हाला स्वतःचे कपडे काढावे लागतात आणि त्यानंतरच असे काही घडू शकते. तुम्ही याला अजाणतेपणी झालेली चूक म्हणू शकत नाही. हे असं नाही की चाकू अपघाताने चालला आणि तुमच्या समोरच्या व्यक्तीचा जीव गेला.”
आकांक्षा चमोला शोमध्ये दिसल्यापासून चर्चेत आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये तिने एक मोठा खुलासा केला, की ती आणि तिचा पती, प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना, लवकरच अधिकृतपणे घटस्फोट घेणार आहेत. हे दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहेत.






