पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची सुरुवात 26 जुलैपासून झाली आहे आणि 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावेळी भारतातील खेळाडूंनी सहभाग घेतलेला दिसून आला आहे. त्यापैकीच एक भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट ही देखील चमकताना दिसली. तिने कुस्तीच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. ही आनंदाची बातमी ऐकून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. विनेश फोगटच्या या विजयाने संपूर्ण देश जल्लोष करत आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर चाहत्यांची एक खास मागणीही समोर आली आहे, जी अभिनेता आमिर खानला केली आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, आता ‘दंगल 2’ बनवावा, ज्यामध्ये आमिर खानने पुन्हा एकदा त्याची जादू दाखवावी. आणि हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसाठी लवकरच सज्ज व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.
आमिरच्या ‘दंगल 2’ चित्रपटाची वेळ आली आहे
विनेश फोगटने पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्ती 50 किलो गटात ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. तिच्या या यशामुळे तिने लोकांच्या मनात अनोखे स्थान निर्माण केले आहे. फोगटने क्यूबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझवर 5-0 असा शानदार विजय मिळवत अंतिम फेरी गाठली, ज्यामुळे ती ऑलिम्पिक कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. अशा परिस्थितीत X खात्यावर #Dangal ट्रेंड सुरु झाला आहे.
नेटिझन्स आता आमिर खान अभिनीत 2016 च्या ब्लॉकबस्टर स्पोर्ट्स बायोपिक दंगलच्या सिक्वेलची मागणी करत आहेत. एका यूजरने लिहिले – ‘नितीश तिवारी सर, कृपया दंगल 2 साठी तयार व्हा कारण आमची राणी विनेश फोगट पॅरिसमध्ये पदक आणणार आहे.’ आणखी एका यूजरने लिहिले – ‘आमिर खान सर, दंगल 2 ची वेळ आली आहे.’ आणखी एका चाहत्याने लिहिले, ‘आता ‘दंगल 2′ विनेश फोगटसोबत.’ दुसऱ्याने लिहिले – ‘विनेश फोगट ‘दंगल 2′ ची स्क्रिप्ट लिहित आहे.’ असं लिहून चाहत्यांनी आपले मत मांडून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कलाकारांनी केले विनेश फोगटचे अभिनंदन
अंतिमफेरीत गेल्यानंतर विनेश फोगटवर चाहत्यांकडून तसेच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजकुमार राव, रणदीप हुडा, तापसी पन्नू, रितेश देशमुख आणि सान्या मल्होत्रा यांनी विनेश फोगटचे अभिनंदन केले आहे. विनेशचा आज म्हणजेच 7 ऑगस्ट रोजी फायनल सामना आहे, ज्यामध्ये तिचा सामना अमेरिकेच्या सारा एनशी होणार आहे.
हे देखील वाचा- विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधान मोदीसुद्धा ॲक्शनमध्ये; पीटी उषांबरोबर केली चर्चा
‘दंगल’ चित्रपट 8 वर्षांपूर्वी आला होता
आमिर खानचा दंगल हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता. जी कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित होती. सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांनी या चित्रपटात गीता आणि बबिता फोगट यांच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘दंगल’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.