( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘केजीएफ’, ‘कांतारा’ आणि ‘सलार’सारखे सुपरहिट चित्रपट देणारी होम्बळे फिल्म्स आता आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माते विजय किरगंदूर यांच्या निर्मितीत साकारणाऱ्या या चित्रपटात सुपरस्टार सूर्या, अभिनेत्री कायाडू लोहार आणि दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल यांची दमदार टीम एकत्र आली आहे.
दोन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूर्या यांनी अनेक सुपरहिट आणि आशयघन चित्रपट दिले आहेत. दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि सात फिल्मफेअर साउथ पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या सूर्या यांनी अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘जय भीम’सारखा गाजलेला चित्रपट देणारे टी. जे. ज्ञानवेल करणार आहेत. सामाजिक आशय, प्रभावी कथा आणि वास्तववादी मांडणीसाठी प्रसिद्ध असलेल्या ज्ञानवेल यांच्या दिग्दर्शनामुळे या नव्या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
गेल्या काही वर्षांत होम्बळे फिल्म्सने ‘केजीएफ’, ‘कांतारा’ आणि ‘सलार’सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देत भारतीय सिनेसृष्टीत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. भारतीय संस्कृती आणि जागतिक दर्जाचे कथाकथन यांचा संगम घडवणारी ही निर्मिती संस्था आता आणखी एका मोठ्या सिनेमासाठी सज्ज झाली आहे.
या चित्रपटासाठी संगीतकार साई अभ्यंकर, छायाचित्रकार एस. आर. काथीर, प्रॉडक्शन डिझायनर के. काथीर आणि संपादक फिलोमिन राज यांची अनुभवी टीम काम करणार आहे.
View this post on Instagram
२९ जून २०२६ रोजी चेन्नईतील पार्क हयात येथे चित्रपटाचा भव्य मुहूर्त पार पडला. या कार्यक्रमाला कलाकार, तांत्रिक टीम आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या चित्रपटाबद्दल बोलताना होम्बळे फिल्म्सचे संस्थापक विजय किरगंदूर म्हणाले, “उत्कृष्ट कथा आणि प्रामाणिक सिनेमाच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. सूर्या आणि टी. जे. ज्ञानवेल यांच्यासोबतची ही भागीदारी त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.”
सूर्या, कायाडू लोहार, टी. जे. ज्ञानवेल आणि होम्बळे फिल्म्स यांचा हा संगम भारतीय सिनेमातील सर्वाधिक चर्चेतील प्रोजेक्टपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






