ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन झाले आहे. मालिनी राजूरकर यांचे पार्थिव हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी 5:30 ते 6:30 या वेळेत दर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. मालिनी राजूरकर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
मालिनी राजूरकर यांचा जन्म 8 जानेवारी 1941 रोजी झाला. त्यांचे बालपण राजस्थानमध्ये गेले. त्यांचे शालेय शिक्षण अजमेरच्या (Ajmer) सावित्री गर्ल्स हायस्कूल मध्ये झाले होते तर तयानंतर त्यांनी गणित या विषयात पदवी घेतली. अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर वसंतराव राजूरकर यांच्यासोबत मालिनी यांनी विवाह केला.
मालिनी यांनी अनेक संगीत महोत्सवात त्यांची कला सादर केली. गुणीदास संमेलन (मुंबई), तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सवाई गंधर्व महोत्सव (पुणे) आणि शंकर लाल महोत्सव (दिल्ली) या संगीत महोत्सवांमध्ये मालिनी राजूरकर यांनी त्यांची कला सादर केली. मालिनीताईंचे टप्पा आणि तराना या गायकीवर विशेष प्रभुत्व होते. मालिनीताईंच्या गायकीवर संगीतज्ञ के.जी. गिंडे , जितेंद्र अभिषेकी आणि कुमार गंधर्व यांचा प्रभाव होता. 1970 पासून त्या हैदराबाद येथे राहात होत्या.
मालिनीताईंना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांना 2001 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर 2008 मध्ये त्यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. बागेश्री,यमन आणि मारवा इत्यादी रागांचे त्यांनी गायन केले. मालिनी राजूरकर यांच्या निधनानं संपूर्ण संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.