गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांच्या सुंदर आवाजाचे अनेक चाहते आहेत. त्यांचा उत्साह तर वाखाणण्याजोगा आहे. आशा भोसले यांनी मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. तसेच त्यांनी काही फिटनेस टिप्सही (Fitness Tips) दिल्या आहेत.
[read_also content=”जेवणानंतर बडीशेप आणि साखर खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/lifestyle/benefits-od-eating-saunf-and-sugar-after-meal-nrsr-283762.html”]
“अनेक लहान मुलं तुमचं पाहून खायला शिकतात. जर तुम्ही त्याच्यासमोर पिझ्झा खाल्ला तर ती लहान मुलं देखील ते खाणार. तुम्ही भाकरी का खात नाही ? माझी आई आम्हाला अनेकदा सांगायची पाच इंद्रियांना सांभाळण्यापेक्षा एका इंद्रियाला सांभाळा ते म्हणजे जीभ. तुमचं खाणं जितकं चांगलं असेल तितके तुम्ही सुंदर दिसाल”, असे त्या म्हणाल्या.
मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आशा भोसले म्हणाल्या, “मी बालपणी जास्त जाड नव्हते. पण फार गोड होते. त्यावेळी दीदी मला कडेवर घेऊन जायच्या. तिला मी फार आवडायची. पण त्यानंतर काही वर्षांनी मी जाड झाली आणि तो जाडपणा बरेच वर्ष राहिला. त्यावेळी उंचीच्या मानानं वजन जास्त झालं होतं. ते वजन कमी करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले. मला त्यावेळी काही खाल्लं तर गाणी गाता येत नव्हती. मी चार- पाच गाणी दिवसातून गायचे.”
“पण मी वयाच्या ६० व्या वर्षापासून माझं वजन ६५ किलो ठेवलं आहे. आतापर्यंत ते तेवढंच आहे. मी जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा मी काही बायका रडत असल्याचे पाहिले. मी सहजच पुढे जाऊन बघितलं तर तेव्हा मला त्यांच्या रडण्याचे कारण समजले. त्यांची मुलं ही फार जाड होती. त्यांना चालताही येत नव्हते.” असेही त्यांनी म्हटले.
“यानंतर मी तातडीने माझ्या सूनेला फोन केला आणि तिला सांगितलं की, माझ्या नातवाला पाकिटातील बंद काही खायला देऊ नको. त्याला फक्त घरातील वरण भात, पोळी दे. लहान मुलांचे सोडा आपण सर्वच जाड आहोत. सर्वांनी चालायला हवं. स्वत:साठी थोडा वेळ काढायला हवा”, असेही त्यांनी सांगितले.