संग्रहित फोटो
पुणे शहरातील वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण झालेले आहेत. सकाळी आणि सायंकाळी तर वाहन चालकांना ‘मुंगी वाट’ काढून इच्छितस्थळी पोहचत आहेत. रस्त्यांची आवस्था गेल्या वर्षाभरात भीषणच होती. एकीकडे वाहतूक कोंडीचा त्रास असताना दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा जोर देखील सोसावा लागत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून दिसत आहे. पोलिस रस्त्यावर उभा राहून वाहतूक कोंडी सोडविण्यापेक्षा तिसऱ्या डोळ्यातील म्हणजे, सीसीटीव्हीतून प्रचंड कारवाया करत असल्याचे दिसत आहे. शहर सुरक्षेसाठी लावलेला तिसरा डोळा सुरक्षेपेक्षा वाहतूक पोलिसांना कारवाईसाठी मोठा फायदेशीर ठरत असल्याचेही नागरिक बोलत आहेत.
वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत राँग साइडने वाहन चालविण्याच्या प्रकारावर सर्वाधिक म्हणजेच ५ लाख ९ हजार ८४३ कारवाया केल्या आहेत. दरवर्षी हेल्मेट न घालणे हा प्रमुख नियमभंग होता, यंदा प्रथमच राँग साइड आणि नो-एंट्री उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. दोन्ही गोष्टींमुळे थेट अपघातांला आमंत्रण देणारे प्रकार असल्याने त्यावर मोठी कारवाई सुरू आहे.
हेल्मेट कारवाईच्या जोडीला मागील दोन वर्षांत टोइंगची कारवाई मोठ्या प्रमाणात होत होती. यंदाही ४ लाख ७९ हजार ४३६ वाहने टोइंग करण्यात आली. याशिवाय सिग्नल न पाळणे, वाहन चालविताना मोबाईल वापरणे, धोकादायक ड्रायव्हिंग अशा विविध नियमभंगांवरही कडक कारवाई झाली आहे. मात्र, साडेतेरा लाख कारवायांपैकी केवळ ४ लाख ६४ हजार २३५ वाहनचालकांनीच दंड भरला आहे. उर्वरित ८ लाख ८९ हजार २७९ जणांकडील दंड अद्याप थकित आहे.
तंत्रज्ञानामुळे नियमभंग टिपला जात असला, तरी दंड वसुलीचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. राँग साइडने वाहन चालविणाऱ्यांवर आता केवळ दंड नव्हे, तर थेट गुन्हे दाखल करण्याची कठोर भूमिका घेण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसात १०० हून अधिक वाहनचालकांवर गुन्हे दाखल झाले असून, आतापर्यंत ही संख्या २०० च्या पुढे गेली आहे.
२०२५ मधील कारवाया (एक जानेवारी ते एक डिसेंबर)
| राँग साइड ड्रायव्हिंग | ५,०९,८४३ |
| टोइंग कारवाई | ४,७९,४३६ |
| सिग्नल न पाळणे | १,५९,११० |
| वाहन चालविताना मोबाइलचा वापर | ३९,१८८ |
| धोकादायक ड्रायव्हिंग | ३६,६४० |
| कारच्या काचांना काळी फिल्मिंग | १६,९७५ |
| साइड मिरर नसणे | १५,९७३ |
| सीटबेल्टचा वापर न करणे | १३,२४२ |
| ड्रँक अँड ड्राइव्ह | ५६७२ |
| हेल्मेट कारवाई | ५४२६ |
| दुचाकीच्या सायलेंसरमध्ये बदल | ३००७ |
| अन्य कारवाई | ६९,००२ |






