मराठी प्रेक्षकांची नस ओळखलेल्या ‘फक्त मराठी’ (Fakt Marathi) या वाहिनीने मनोरंजन विश्वाला अजून आपलंस करत ‘फक्त मराठी सिने सन्मान’ (Fakt Marathi Cine Sanman) हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. कोरोनानंतर पूर्ववत झालेल्या मनोरंजन सृष्टीच्या पंखांना बळ देण्यासाठी तसेच मनोरंजन सृष्टीत असलेल्या मराठी अस्मितेचा सन्मान करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन फक्त मराठी वाहिनीने (Fakt Marathi Award Function) केले होते. आता फक्त मराठी सिने सन्मान पुरस्कार सोहळा येत्या २१ ऑगस्ट रोजी फक्त मराठी वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
[read_also content=”गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याच्या निर्णयाला अजित पवारांचा आक्षेप, चंद्रकांत पाटलांनी दिलं प्रत्युत्तर https://www.navarashtra.com/maharashtra/minister-chandrakant-patil-reply-to-ajit-pawar-over-reservation-to-govindas-in-government-jobs-nrsr-317992.html”]
सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी अशा अनेक चित्रपट कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याला चार चांद लावणारी बाब म्हणजे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या विद्या बालन यांनी विद्याधर भट्टे या हरहुन्नरी रंगभूषाकाराचा केलेला गौरव. विद्याधर भट्टे यांनी रंगभूषा करत अनेक कलावंतांना चरित्र भूमिकेसाठी तयार केले आहे. या रंगभूषेमुळे चरित्र भूमिका करणारा कलाकार त्या पात्राच्या जवळ जाऊ शकला आहे. तर या रंगभूषाकाराने चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान हे अमूल्य असून त्याचाच गौरव फक्त मराठी सिने सन्मानच्या व्यासपीठावर झाला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्ण काळ दाखवणारे आणि अवघे पाऊणशे वयोमान आहे असं म्हणणारे महाराष्ट्राचे लाडके दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा गौरव या सन्मान सोहळ्यात करण्यात आला. हा विशेष सन्मान सचिन पिळगावकर यांची आई आणि कुटुंबीय यांच्या हस्ते करण्यात आला आहे. धर्मवीर, चंद्रमुखी, सोयरीक, लोच्या झाला रे, पांघरूण अशा अनेक चित्रपटांना या सिने सन्मान सोहळ्यात नामांकन प्राप्त झाले आहे. तर सूत्र संचालकांची नवीन जोडी या सिने सन्मान मराठी पुरस्कार सोहळ्याने दिली ती म्हणजे अमेय वाघ आणि ओंकार भोजने. या दोघांच्या तुफान विनोदी षटकारांनी फक्त मराठी सिने सन्मान उजळून निघाला.