गोव्यात ५३ व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२’मध्ये (इफ्फी) (IFFI) ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर (India Lockdown) होणार आहे. मधुर भांडारकरने (Madhur Bhandarkar) या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कोरोना (Corona) आणि टाळेबंदी यामुळे देशभरात काय उलथापालथ झाली याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
[read_also content=”गुरमीत आणि देबिनाच्या घरी मुलगी झाली हो, सोशल मीडियाद्वारे दिली बातमी https://www.navarashtra.com/movies/gurmeet-chaudhary-and-debina-bonnerjee-blessed-with-a-baby-girl-nrsr-343736.html”]
गोव्यात पणजीमध्ये २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर होणार आहे. दोन वर्षांपूर्वी २०२० च्या मार्चमध्ये संपूर्ण जगावर कोरोनाचे महासंकट आले होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारत सरकारने अचानक २१ दिवसांसाठी टाळेबंदी घोषित केली. त्यानंतर नागरिकांचा गोंधळ उडाला. शहरातील मजुरांचे तांडेच्या तांडे काम नसल्याने पायी चालत गावाकडे परतत होते. त्यांना तिथे पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्या काळात घडलेल्या अशा अनेक भीषण घटनांवर चित्रपट भाष्य करण्यात आले आहे.
टाळेबंदीतच जन्माला आलेला हा चित्रपट इफ्फी महोत्सवात जगभरातून आलेल्या चित्रपटप्रेमींना दाखवण्यात येणार यासारखा आनंद नाही, अशी भावना मधुर भांडारकर यांनी व्यक्त केली. चार प्रमुख पात्रांच्या माध्यमातून कोरोनाकाळ आणि टाळेबंदीतील कथा-व्यथा मांडणाऱ्या ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटात श्वेता बसू प्रसाद, प्रतीक बब्बर, सई ताम्हणकर, आहाना कुम्रा आणि प्रकाश बेलावडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मधुर भांडारकरच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बबली बाऊन्सर’ या चित्रपटाप्रमाणेच ‘इंडिया लॉकाडऊन’ हा चित्रपटही थेट ‘झी ५’वर २ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.