फोटो सौजन्य - Social Media
भुसावळ रेल्वे विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील डिसेंबर २०२५ महिन्यात उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवली असून, विविध उत्पन्न स्रोतांमधून एकूण १५२.९५ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर २०२४ च्या तुलनेत महसुलात सुमारे २३ टक्के वाढ झाली असून, विभागाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा हा सकारात्मक परिणाम मानला जात आहे.
विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघभावनेतून केलेल्या कामामुळेच ही लक्षणीय वाढ शक्य झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि वेळेवर सेवा देण्यावर भर देण्यात आल्याने महसुलवाढीस चालना मिळाली आहे. भुसावळ रेल्वे विभाग भविष्यातही आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि प्रवासी सोयी वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. डिसेंबर २०२५ मध्ये राबविण्यात आलेल्या सखोल व नियोजित तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान विनातिकीट, अयोग्य किंवा अवैध प्रवास करणाऱ्या ६० हजार ६७० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून ४.५८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. डिसेंबर २०२४ मध्ये हा दंड ४.०५ कोटी रुपये इतका होता. त्यामुळे दंड वसुलीतही सुमारे १३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
तिकीट तपासणी मोहिमांमध्ये डिजिटल पद्धतीचा अधिक वापर केल्यामुळे दंड वसुली प्रक्रिया सुलभ, जलद आणि पारदर्शक झाली आहे. यामुळे अनावश्यक वाद टाळता येत असून प्रवाशांमध्ये शिस्त राखण्यास मदत होत आहे. रेल्वे प्रशासनाला आरक्षण शुल्क, पार्सल सेवा तसेच कोचिंगशी संबंधित उपक्रमांतून सुमारे ६.४४ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर पेट्रोलियम पदार्थ, कांदा, डीओसी, ऑटोमोबाइल एनएमजी, अन्नधान्य व सिमेंट यांसारख्या विविध मालवाहतुकीतून तसेच इतर शुल्क व सेवांमधून ६४.५१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, स्वच्छता अभियान, प्रवासी सुविधांचा विस्तार तसेच तांत्रिक सुधारणा अशा विविध क्षेत्रांत भुसावळ रेल्वे विभागाने अनेक उपक्रम राबविले आहेत. यामुळे प्रवाशांचा रेल्वे सेवांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना योग्य व वैध तिकीट खरेदी करून जबाबदारीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वेळेची बचत, गर्दी टाळणे आणि सुरक्षित प्रवासासाठी रेलवन मोबाइल अॅप व डिजिटल सेवांचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.






