राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था गेल्या काही काळापासून चिंताजनक झाली आहे. अनेक बसेस कालबाह्य, नादुरुस्त आणि रस्त्यावर धावण्यासाठी अयोग्य झाल्याने प्रवाशांना असुरक्षित प्रवास करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने नवीन बस दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार वाशिम आगारात १० नवीन एसटी बस दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित बसेसची अवस्था अजूनही बिकट असल्याने प्रवाशांचा त्रास कायम आहे.
ना इंडिकेटर, ना ब्रेक लॅम्प चालू! PMP ची दुरावस्था कधी संपणार? वाहनचालकांना कल्पना न आल्याने…
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम येथील एसटी आगारातून जिल्ह्यांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरील लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या नियमितपणे चालवल्या जातात. सध्या वाशिम आगारात एकूण ५१ एसटी बसेस उपलब्ध आहेत. मात्र, यापैकी अनेक बसेस तांत्रिक बिघाड, जुनी अवस्था आणि वारंवार होणाऱ्या दुरुस्त्यांमुळे पूर्ण क्षमतेने धावू शकत नाहीत. त्यामुळे नवीन बसेसची गरज दीर्घकाळापासून व्यक्त केली जात होती. आगार व्यवस्थापनाने वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वाशिम आगाराला १० नवीन बस मंजूर करण्यात आल्या. या नव्या बसेस दाखल झाल्यानंतर काही नादुरुस्त व कालबाह्य बसेस ताफ्यातून काढून टाकण्यात आल्या आहेत. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी वाशिम आगारातील बस फेऱ्या आणि प्रवाशांची संख्या पाहता ही संख्या अत्यंत अपुरी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
आगार व्यवस्थापक अनिरुद्ध मेहत्रे यांनी सांगितले की, “वाशिम आगारातील अनेक बसेस रस्त्यावर धावण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे नवीन बसेसची गरज आहे. सध्या १० बस मिळाल्या असल्या तरी आणखी बसेस मिळाव्यात, यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.” दरम्यान, बहुतांश बसेस जुनी आणि कालबाह्य झाल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. पूर्वी सुरक्षित प्रवासाचे प्रतीक मानली जाणारी एसटी सेवा आता अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड, रस्त्यातच बस बंद पडणे, उशीर आणि गैरसोयींसाठी ओळखली जाऊ लागली आहे. त्यामुळे खासगी वाहनांकडे प्रवाशांचा ओढा वाढत असल्याचे चित्र आहे.
Ahilyanagar News: बंटी जहागीरदार दहशतवादीच! राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याचे भाजपा जिल्हाध्यक्षांकडून समर्थन
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम सेवा देण्याच्या उद्देशाने नवीन अत्याधुनिक बसेस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. वाशिम आगारासाठी किमान ४० नवीन बसेस मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ १० बसेसच मिळाल्याने वाशिमकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “प्रवाशांना सुरक्षित आणि आनंददायी प्रवास देण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल स्वागतार्ह असले, तरी अपुऱ्या बसेसमुळे ते मृगजळ ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटू लागल्या आहेत. त्यामुळे वाशिम आगाराला तातडीने अधिक नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.














