अपघातातून थोडक्यात बचावलेल्या कश्मीरा शाहने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, मी बरी आहे, पण नाकावरचं…”
‘लाफ्टर शेफ’ शोच्या माध्यमातून कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कश्मिरा शाह एका अपघातामुळे चर्चेत आहे. तिचा एका आठवड्यापूर्वी म्हणजेच १८ नोव्हेंबरला अमेरिकेतल्या लॉस एंजेलस शहरात भीषण अपघात झाला होता. या अपघातात अभिनेत्री थोडक्यात बचावली होती. सध्या अभिनेत्री परदेशातच असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना दररोज हेल्थ अपडेट देताना दिसत आहे. अशातच अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करत इन्स्टाग्रामवर चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे.
अल्लू अर्जुनला आव्हान? पहिल्याच दिवशी ‘पुष्पा २’ हा ‘मिस यु’ चित्रपटाला सिनेमागृहात भिडणार!
व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने चाहत्यांना तिच्या नाकावरची जखम दाखवली असून तिच्या प्रकृतीबद्दलही माहिती तिने दिलेली आहे. कश्मिराने अमेरिकेतल्या लॉस एंजेलस शहरातील रस्त्यावर चालत असताना एक व्हिडिओ कॅप्चर केला आहे. त्यामध्ये तिने चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिलेली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कश्मिरा म्हणते, “माझ्या नाकावरचं मोठी बँडेज पट्टी काढली आहे, सध्या एक लहान पट्टीच आहे. पण आता मी बरी आहे. सर्वांचे आभार, लव्ह यू ऑल… रस्ता ओलांडत आहे, नाहीतर इथेच पडायचे. प्रार्थना केल्यात त्यासाठी सर्वांचे आभार, लव्ह यू.”
दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीने डॉक्टरांसोबतचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली. कॅप्शन शेअर करत अभिनेत्री म्हणते, “अखेर नाकावरची पट्टी काढली आहे. जास्त मोठे नाकावरील जखमेचे व्रण राहणार नाही, हे ऐकून बरं वाटलं. आता वेळच सगळं नीट करेल. जखम वेगाने भरत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी आणि प्रार्थनेसाठी खूप आभार. कुटुंब आणि मित्रपरिवाराव्यतिरिक्त माझ्या बाजूने एवढी मोठी सोशल मीडिया फॅमिलीही आहे हे पाहून मला मोठा आधार मिळाला आहे. सगळ्यांना खूप प्रेम… आणि माझ्या प्रेमळ नवऱ्याचेही आभार जो अपघाताबद्दल समजताच लगेच फ्लाईट पकडून येणार होता. तू माझी मोठी सपोर्ट सिस्टिम आहेस. माझ्या डॉक्टरांचेही खूप आभार.”
कृष्णा अभिषेक आपल्या पत्नीसोबत आणि दोन मुलांसोबत लॉस एंजेलिसला गेला होता. पण कृष्णा अभिषेक आणि त्याचे दोन मुलं ७ नोव्हेंबरला भारतात आले. पण काही कारणास्तव कश्मिरा लॉस एंजेलिसला थांबली आहे. दरम्यान मॉलमध्ये फिरत असताना कश्मिरा आरशाला जोरात धडकली. काचा उडाल्याने तिच्या नाकाला मोठी जखम झाली. अतिशय भयानक असा हा अपघात होता. रक्ताने माखलेल्या टिश्यूंचा फोटो कश्मिराने १८ नोव्हेंबरला शेअर केला होता. आता अपघातानंतर अभिनेत्री भारतात केव्हा येणार? हे अद्याप अस्पष्ट आहे. कश्मिराने ‘लालबाग परळ’, ‘शिकारी’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून ती हिंदी फिल्मइंडस्ट्रीतही सक्रिय आहे.