दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’(Baipan Bhari Deva) या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. त्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एक पोस्ट करत याबद्दल सांगितलंय.
केदार शिंदे यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलंय. त्यात त्यांनी या चित्रपटाने पहिल्या वीकेंडच्या (Baipan Bhari Deva First Weekend Collection) कमाईबद्दल सांगितलं आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला 6.45 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस सर्वाधिक कमाई करणारा हा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे. यानिमित्ताने केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.
केदार शिंदे यांनी लिहिलं आहे की,“ही स्वामींची कृपा. हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद. मला 21 वर्ष लागली दादरचा एक रस्ता क्रॉस करायला! 2002 साली सही रे सही आलं. त्याला तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेली कित्येक वर्ष त्याचे “हाऊसफुल्ल” चे बोर्ड मी पाहातो आहे. त्यानंतर अनेक नाटकं, सिनेमे यालाही भरभरून प्रतिसाद दिलात. अगं बाई अरेच्चा, जत्रा ते महाराष्ट्र शाहीर पर्यंतच्या प्रवासात तुमची साथ लाखमोलाची ठरली. मात्र खऱ्या अर्थाने “सही” नंतर “बाईपण भारी देवा” चं हे यश पाहातो आहे. याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात. मी काम अविरतपणे सुरू ठेवेन. तुम्ही मात्र सोबत राहा. खुप भावना व्यक्त करायच्या आहेत. पण योग्य वेळी नक्कीच करीन”.
दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल सुरू आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात दणदणीत कमाई करताना दिसतोय. प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करतायत.
सहा बहिणींची कथा
या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे.