अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील मुलगी झाली हो (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढून टाकल्यानंतर प्रोडक्शन हाऊस, मालिकेतील कलाकार, ट्रोलर, नेतेमंडळी यांच्या अनेक प्रतिक्रिया येत होत्या. मालिकेतील काही कलाकारांनी त्यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवला होता. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा मानस किरण माने यांनी बोलून दाखवला होता. आज एक फेसबुक पोस्ट (Kiran Mane Facebook Post) करुन नव्या लढ्याची घोषणाच किरण माने यांनी केली आहे.
किरण माने ४ फेब्रुवारीला दुपारी साडे तीन वाजता ते मुंबई (Mumbai) प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद (Kiran Mane Press Conference) घेणार आहेत. त्याविषयीची एक सविस्तर फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
किरण माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,“ प्रेस काॅन्फरन्स घेतोय उद्या. मुंबईत….लै खुलासे करायचेत.
लै गुपितं उलगडायची हायेत. हा आता माझा एकट्याचा लढा नाय र्हायला. तुम्हा सगळ्यांचा झालाय.तुमी कुठल्याबी क्षेत्रात असा, तुमाला न सांगता-गुपचूप कटकारस्थान करून तुमाला कामावरनं काढायची छाती नाय झाली पायजे कुनाची. कुठलीबी स्त्री असो वा पुरूष..तुमच्यावर खोटे आरोप करताना हजारवेळा इचार करंल असं कायतर करून दाखवतो…संविधानिक मार्गानं.. बघाच तुमी !
#किरण_माने_पॅटर्न हितनं फुडं तुमच्यावर कस्लाबी अन्याय होऊ देनार नाय !!!…आवो, पैशाचा… सत्तेचा… वर्चस्ववादाचा माज एकच गोष्ट उतरवू शकते… ‘संविधान’ ! मला वाटलंवतं की ह्या अत्यंत क्रूर, निर्दयीपणे केलेल्या अन्यायाबद्दल या यंत्रनेचा ‘अंतरात्मा’ जागा होईल.. कुठल्यातरी राजकिय नेत्याला आपला सोत्ताचा संघर्ष आठवंल… पन नाय.. ९९% राजकीय नेते भांडलवलदारांचे गुलाम हायेत. माझ्यावर अन्याय करनारी यंत्रना पैशांच्या धुंदीत हाय… “आपण राजकिय नेते खिशात घेऊन फिरतो.. काहीही कारस्थान करू.. हा कोण क्षुल्लक सामान्य माणूस आपल्याशी लढू पहातोय??? अस्सा खड्यासारखा बाजूला करू त्याला.” अशा मग्रूरीत हायेत ही धेंडं.
…पन भावांनो, ही मुजोरी-बेबंदशाही मोडून काढण्याचा शेवटचा मार्ग डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात ठेवलाय की. आता सुट्टी नाय. जीवाचं रान करीन.. रक्ताचं पानी करीन…होत्याचं नव्हतं करीन… पन न्याय मिळवूनच राहीन… जिंकेन नायतर मरेन. जिंकलो, तर तुम्हा सगळ्यांचा विजय आसंल… मेलो…तर मात्र तुम्हा सगळ्यांना मुडद्यासारखं जगत, खाली मान घालून, घाबरत काम करावं लागंल… मान वर केली, आवाज उठवला, बंड केलं तर “ए तुझा किरण माने करेन.” असं सुनावलं जाईल…पन काय बी म्हना.. या लोकांनी अन्याय करायला लै चुकीचा मानूस निवडला भावांनो.. नाय नाय नाय नाय… लै हार्ड मानसाला हात घातलाय ह्या बेट्यांनी ! नाय ह्यांना पळता भुई थोडी केली तर किरण माने नांव लावनार नाय…उद्या…४ फेब्रुवारी.. दुपारी ३.३० वाजता, मी आणि माझे वकिल असिम सरोदे-रमा सरोदे प्रेस काॅन्फरन्स घेतोय… मुंबई प्रेस क्लब.. आझाद मैदान पोलीस स्टेशनसमोर, मुंबई. जमलं तर या.जय जिजाऊ…जय शिवराय… जयभिम… तुकाराम महाराज की जय ! #किरण_माने_पॅटर्न.”
या किरण मानेंच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. आता उद्याच्या पत्रकार परिषदेत किरण माने काय खुलासे करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.