Raj Thackeray And Uddhav Thackeray Vijayi Melava Regards Marathi Actor Kiran Mane Shared Post
सरकारने महाराष्ट्रातील हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर आज (५ जुलै) ठाकरे बंधूंकडून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठी बांधवांनी उपस्थिती लावली होती. वरळीतील NSCI डोममध्ये विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल २० वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्हीही बंधू राजकीय मंचावर एकत्र आले होते. या विजयी मेळाव्याला अनेक मराठमोळ्या सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती.
या मेळाव्याविषयी अनेक सेलिब्रिटी आपलं मत व्यक्त करताना दिसत आहे. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित आणि चिन्मयी सुमित हे कलाकार उपस्थित राहत त्यांनी मेळाव्याविषयी आपलं मत व्यक्त केले होते. या कलाकारांनंतर अभिनेते किरण मानेने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने फेसबूकच्या माध्यमातून मोजक्या शब्दातच आपलं मत मांडलं आहे. किरण मानेने “अनाजीपंता, कितीबी आग लाव, जळनार नाय, ह्यो महाराष्ट्र तुला येड्या कळनार नाय #एकजूट” अशी पोस्ट शेअर केलेली आहे.
किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टखाली अनेकांनी “ठाकरे हाच ब्रँड”, “आता खरी मजा येणार”, “सोनेरी क्षण”, “महाराष्ट्र धर्माची एकजूट” अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर युतीचे संकेत दिले आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी “आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाठ अण्णाजीपंतांनी दूर केला आहे. आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी” मत व्यक्त केलं.