"मारकडवाडीकरांनी क्रांतीची तुतारी फुंकत बंडाची पहिली मशाल पेटवली", मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत...
विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी गावातच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली. २० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत या गावाने केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून आल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया राबवण्याची संपूर्ण तयारीही केली होती. आज सकाळी मतदान प्रक्रियेला सुरूवात होणार, त्यापूर्वीच गावात पोलीस प्रशासन दाखल झाले, गावात जमावबंदी लागू करण्यात आली.
मारकडवाडीच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मराठी अभिनेता किरण मानेने एक भलीमोठी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने गावकऱ्यांच्या मागणीचे कौतुक केले आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण मानेने लिहिले की, “मारकडवाडीच्या ग्रामस्थांना सलाम! हुकूमशाही भित्री असते. बुळगी असते. फक्त तिच्यावर चाल करुन जायला असे निधड्या छातीचे, ताठ कण्याचे, सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपूत्र लागतात. भले ते हुकूमशहांच्या ‘सो कॉल्ड’ महाशक्तीपुढे संख्येनं कमी असतील… पण ते या शैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात. ‘आमच्या गांवातनं भाजपाला ऐंशी टक्के मतदान होऊच शकत नाही. इव्हीएम मशिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आहे. भलेही आमचा उमेदवार जिंकूदेत… पण आमच्या गांवातनं त्याला कमी झालेले मतदान हा आमच्या खुद्दारीवर लागलेला कलंक आहे.. आमचे गांव गद्दारी करणार नाही आणि गद्दारांना साथ देणार नाही.’ ही अस्वस्थता त्यांचं मन खाऊ लागली… शेवटी सगळ्या गांवानं ठरवलं की आपल्यापुरतं बॅलेट पेपरवर मतदान घेऊया. किमान आपल्या काळजाला लागलेली टोचणी तरी थांबेल.’ “
“मतदानाची तारीख पक्की झाली : तीन डिसेंबर आणि काल अचानक पाच डिसेंबरपर्यंत मारकडवाडीवर जमावबंदीचा आदेश लादला गेला आहे. मराठा मोर्चावर झालेला लाठीचार्जासारखं बातम्यात ‘प्रशासन-प्रशासन’ असं म्हणायचे आदेश आले असावेत. पण प्रशासनाला कुणाचे आदेश जातात हे पब्लिकला कळतं. तरीही ग्रामस्थांनी निर्धार केला आहे, “लाठीचार्ज सहन करू, गोळ्या झेलू… पण मतदान होणारच!” ही खरी छ. शिवरायांच्या आणि शाहु फुले आंबेडकरांच्या विचारांची भुमी ! इतिहासातनं प्रेरणा घ्यायची असते ती अशी. अहो, औरंगजेब सुद्धा महाशक्ती होता. जगातल्या पाच महाबलाढ्य बादशहांपैकी एक. अफगाणिस्तानपासून आसामपर्यंत त्याची सत्ता होती. शिवरायांकडचे अनेक सरदार, सरंजामदार, वतनदार ईडीला घाबरुन पळाल्यागत औरंगजेबाला सामील झाले होते. महाराष्ट्राची माती त्याला विकायची सगळी तजवीज त्या गद्दारांनी केली होती… पण अशाच लढवय्या वृत्तीच्या मुठभर मावळ्यांना सोबत घेउन छ. शिवराय आणि शंभुराजे पितापुत्रांनी औरंग्याला तब्बल अठ्ठावीस वर्ष झुंजवलं होतं. शेवटी त्याची कबर या महाराष्ट्रात खणावी लागली ! मारकडवाडीकरांनी क्रांतीची तुतारी फुंकत बंडाची पहिली मशाल पेटवली आहे. त्यांच्या उद्याच्या पिढ्या अभिमानानं सांगतील की लोकशाहीची हत्या होत असताना मारकडवाडी गांवानं आपलं इमान आणि सत्त्व जागं ठेवलं होतं.”