मुख्यमंत्र्यांकडून अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत विचारपूस
बॉलिवूड अभिनेता गोविंदच्या पायाला गोळी लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेता त्याचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत असताना हा अपघात झाला. यादरम्यान गोविंदाला गोळी लागल्याने त्याच्या पायाला मोठ दुखापत झाली आहे. त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायातून गोळी काढण्यात आली असून सध्या त्याच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्या जवळचे नातेवाईक आणि सेलिब्रिटी फ्रेंड्स त्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासोबत झालेल्या अपघातातबाबत विचारपूस केली. राज्य शासन आणि जनतेच्यावतीने लवकर बरे होण्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री मुख्यमंत्री यांनी दिली. तसेच आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची बातमी कळताच कश्मिरा शाहने तातडीने हॉस्पिटल गाठले. यावेळी अभिनेत्री हॉस्पिटलबाहेर दिसली. पापाराझींनी काश्मिराला पाहताच तिला घेरले. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र यावेळी कश्मिरा काहीच बोलली नाही. गोविंदाची पत्नी या मुद्द्यावर अनेकदा बोलली असून तिने कृष्णा अभिषेकसोबत जमत नसल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र सर्व वाद विसरून गोविंदा भाचीच्या लग्नाला पोहोचला होता. कश्मिराही सर्व काही बाजूला ठेवून कठीण काळात गोविंदा यांच्या कुटुंबासोबत उभी राहिली आहे.
“नमस्कार, मी गोविंदा… तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी अगदी सुखरूप आहे. माझ्या पायाला गोळी लागली होती, ती काढण्यात आली आहे. माझ्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे मी आभार मानतो. प्रार्थनासाठी तुम्हा सर्वांचेही धन्यवाद…” ऑडियो नोटच्या माध्यमातून गोविंदाने पहिली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत असताना त्याला गोळी लागली. त्याच्या गुडघ्याजवळ गोळी लागली असून अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदा पहाटे ४.४५ वाजता शूट करण्यात आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील घराजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या गुडघ्यात गोळी लागली. परवानाधारक रिव्हॉल्व्हर तपासत असताना त्याचा नेम चुकला आणि अभिनेता जखमी झाला.