'मंगला'वरील ऍसिड हल्ल्याचं गूढ १० जानेवारीला उलगडणार , चित्रपटाची उत्सुकता शिगेला
महिलांवरील अत्याचार आणि महिलांवर होणारे हल्ले अशा आशयाचे अनेक चित्रपट आजकाल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील अनेक चित्रपटांचे कथानक सत्य घटनेवर आधारित असतात तर काही कथानक काल्पनिक असतात. दरम्यान एका सुप्रसिद्ध गायिकेचा थक्क करणारा जीवन प्रवास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मंगला’ असं या चित्रपटाचं नाव असून त्या चित्रपटाचं मोशन पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर रिलीज झालं होतं. त्यामध्ये पाठमोरी बसलेली ही अभिनेत्री कोण आहे ? आता या प्रश्नाचं चाहत्यांना उत्तर मिळालं आहे.
‘मंगला’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब दिसणार आहे. नुकतंच चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि अभिनेत्री शिवाली परब यांनी यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या चरणी लीन होऊन चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण केले आहे. शिवाली परबने आपल्या अफलातून कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. पण पहिल्यांदाच अभिनेत्रीने चित्रपटामध्ये गंभीर विषयाचं पात्र साकारलं आहे. खरंतर, ‘मंगला’ चित्रपटाच्या माध्यमातून शिवाली प्रमुख भूमिकेत दिसणार असून ती रुपेरी पडद्यावरही पदार्पण करणार आहे.
सत्य घटनेवर आधारित आणि भयावह घटनेतून वाचलेल्या ‘मंगला’या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. पोस्टरबद्दल सांगायचे तर, शिवालीचे चित्रपटातील तीन वेगवेगळे लूक दिसत आहे. कौलारू वाडा दिसत आहे आणि त्यातलं एक दाम्पत्य दिसत आहे. मंगला नावाच्या गायिकेवर ॲसिड हल्ला करण्यात आला होता. आयुष्यात आलेल्या सर्व परिस्थितींशी दोन हात मंगलाने कसे केले ? तिच्यावर ॲसिड हल्ला करण्याचं कारण काय ? अशा अनेक प्रश्नांवर हा चित्रपट भाष्य करणारा आहे.
सुप्रसिद्ध गायिकेवर झालेला ॲसिड अटॅक आणि त्यानंतर तिच्या आयुष्यातील खडतर प्रवासाची झुंज या चित्रपटात पहायला मिळणार आहे. त्या काळात ॲसिड अटॅकवर कोणतेही कायदे नसल्यानं न्याय मिळवण्यासाठी मंगलाची धडपड या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. ‘रैश प्रोडक्शन प्रा.लि’,‘फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘मंगला’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांच्याकडे आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे.