(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
प्रत्येकाच्या आयुष्यात महाविद्यालयीन जीवन हा एक खास अविस्मरणीय कोपरा असतो. आईवडिलांपासून दूर राहून एकाकी हॉस्टेलवर राहून शिक्षण घेणाऱ्यांसाठी तर ही जीवनाची पाठशाळा असते. एक मात्र खरं की, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात हा काळ एका वेगळ्याच जाणिवेनं आणि गोंधळाने भारलेला असतो. याच विश्वाची ओळख करून देणारं ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातील ‘लाईफ म्हणजे गोंधळ नुसता’ हे गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातून तारुण्यातील ही संभ्रमावस्था दाखवण्यात आली आहे. संदीप सावंत दिग्दर्शित आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा मराठी चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
‘लाईफ म्हणजे गोंधळ नुसता..
कन्फयुजन कन्फयुजन..
हे करू की ते करु..
मिळत नाही सोल्युशन
पराग फडके यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याला गायक पराग फडके आणि अन्य कलाकारांचा स्वरसाज लाभला आहे. या गाण्याला पराग फडके यांनी चाल दिली आहे. ऋषिकेश ठाकूरदेसाई, चिराग कबाडे, रमण पुजारी, त्रिगुण पुजारी यांचे संगीत संयोजन आहे. या गाण्याच्या शब्दांमधून तरुणाईच्या ज्या भावना आहेत व्यक्त झाल्या आहेत. तरुणविश्वाचं दर्शन घडवत असताना आपल्याच जीवनातल्या अनेक प्रसंगांचं कोलाज आपल्यासमोर उभं करणारं हे गाणं आहे.
जयदीप कोडोलीकर, प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे,अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस यांसारखे कलाकार या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहेत. डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या ‘मृत्यूस्पर्श’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. अनेक लोक आपल्या आयुष्यातील अपूर्णता स्वीकारून आनंदाने जगत असतात. अगदी छोट्या, साध्या, नैसर्गिक गोष्टींमध्ये, अनुभवांमध्ये ही आनंदाच्या अनेक छटा लपलेल्या असतात. त्यांचा शोध घेणं, त्यातली गंमत अनुभवणं यातच आपल्या जगण्याचा अर्थ सामावलेला असतो, हे सांगण्याचा प्रयत्न ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.
पॅनोरमा स्टुडिओज सादरकर्ते असलेल्या ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे सहाय्यक निर्माते रजत गोस्वामी आहेत. पायोस मेडिलिंक्स प्रायव्हेट लिमिटेड, जयसिंगपूर निर्मित ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाची पटकथा-संवाद-दिग्दर्शन संदीप सावंत यांचे आहे. छायाचित्रण प्रियशंकर घोष तर संकलन दिनेश पुजारी यांनी केले आहे.
हे देखील वाचा – Prithvik Pratap: अभिनेता पृथ्विक प्रताप अडकला विवाह बंधनात आणि केली ही कौतुकास्पद गोष्ट !
साऊंड डिझाइन सुहास किशोर राणे यांचे आहे. पार्श्वसंगीत विवेक पाटील, आकाश जाधव यांचे आहे. वेशभूषा कुलदीप चव्हाण, सेजल पाटील, राजश्री चारी यांची आहे. रि-रेकॉर्डिंगमिक्सर अनुप देव CAS यांचे आहे. व्यावसायिक सल्लागार देवयानी गांधी आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे. संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. हा चित्रपट ८ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.