(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अलीकडेच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहर शेख यांनी विजय मिळवला. निवडणूक जिंकल्यानंतर सहर युनूस शेख यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होते. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा होत आहे. विजयानंतर भाषण करताना सहर शेख यांनी ”कैसा हराया, अभी हम लोगों को मुंब्रा को पूरा हरा कर देना है”, असं वक्तव्य केलं होते.या वक्तव्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत असून आता सयाजी शिंदे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
यावर सयाजी शिंदे म्हणाले, ” कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही, सगळे रंग हे निसर्गाच्या बापाचे आहेत”, अशी रोखठोक प्रितिक्रिया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले, ”निसर्ग आपलं मुळ आहे त्यात सगळेच रंग आहेत. ते कुणालाच तयार करता येत नाहीत. ते निसर्गातून येतात. ते फक्त झाडातूनच येतात.”
दरम्यान, ठाणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सहर शेख म्हणालेल्या, हा फक्त ट्रेलर आहे. पुढच्या निवडणुकीत मुंब्रा शहर संपूर्ण हिरवं करून टाकू, मुंब्य्रातून विरोधकांना पळवून लावू आणि इथला प्रत्येक उमेदवार एमआयएमचाच असेल”. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून टीका करण्यात आली आहे. तसेत मराठी मनोरंजन विश्वातून देखील यावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. नुकताच मराठी अभिनेता अभिजीत केळकरनेदेखील एका व्हिडिओद्वारे टोला लगावला आहे.
सयाजी शिंदे जुन्नर तालुक्यात देवराईच्या कामानिमित्त आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील पहिली देवराई छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जुन्नर तालुक्यात सुरू करत आहोत. संतांचे जे दुर्लक्षित विचार राहिले आहेत, ते आम्ही पुढे घेऊन जात आहोत. सध्या येथे एक हजार झाडांची लागवड करण्यात आली असून आणखी दहा हजार झाडे लावण्याचा आमचा संकल्प आहे. नाशिकच्या तपोवनमधील झाडतोडीप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तपोवनची जागा सोडून जिथे कुंभमेळा भरवायचा असेल, तिथे भरवावा. कुंभमेळा ही एक चांगली परंपरा आहे, मात्र झाडांची परंपरा ही त्याहूनही अधिक महत्त्वाची आहे. मला राजकारणातले काहीच कळत नाही आणि त्यात मला रसही नाही. हजारो वर्षांपासून राजकारण सुरू आहे आणि आजही ते तसेच चालू आहे; त्यात काहीच नवे नाही.”






