पुरस्कार सोहळ्यांत छाप पाडणाऱ्या 'ढाई आखर' चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
मराठी इंडस्ट्रीतील सुंदर आणि सालस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या नवनवीन प्रोजेक्टमुळे कमालीची चर्चेत आहे. ‘गुलाबी’, ‘पैठणी’ आणि आता ‘ढाई आखर’ चित्रपटामुळे अभिनेत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच ‘ढाई आखर’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला असून चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
प्रवीण अरोरा दिग्दर्शित ‘ढाई आखर’ चित्रपटाचे लेखन अमरीक सिंह दीप यांनी केले आहे. या चित्रपटाचे कथानक ‘तीर्थाटन के बाद’ कादंबरीवर आधारित आहे. ट्रेलरबद्दल बोलायचे तर, प्रेम, भावना आणि नात्यातील भावनांची गुंतागुंत उत्तम मांडण्याचा प्रयत्न चित्रपटामध्ये करण्यात आला आहे. एक महिला स्वत:ची ओळख शोधण्यासाठी संघर्ष करताना आणि जखडताना दिसत आहे. यासोबतच ती ओळख शोधताना प्रेमाच्या कोमल भावनांचाही अनुभव घेताना दिसते. ट्रेलरमधील काही संवाद हृदयाला भिडणारे आहेत. “तुमचं आमचं नातं काय आहे?” यावर उत्तर येतं, “नात्याला नाव असणं गरजेचं आहे का?” तसेच “अनोळखी पुरुषासोबत लग्न करणे, त्याच्यासोबत संभोग करणे आणि त्याच्या अंशाला आपल्या गर्भात वाढवणे पाप आहे,” अशा संवादातून दुःख आणि वेदनाही दिसून येतात.
ट्रेलरच्या शेवटी, “जिथं बंधन असतं, तिथं प्रेम नसतं, आणि जिथं प्रेम असतं, तिथं बंधन नसतं,” हा संवाद प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो. या २ मिनिटे ४० सेकंदाच्या ट्रेलरमध्ये प्रेम आणि मानवी नात्याची कथा प्रभावीपणे सांगितली जाते. “तुम मुखातिब भी हो और करीब भी, तुमको देखे कि तुमसे बात करे” ही शायरी देखील लक्षात राहते. या चित्रपटाचे संवाद असगर वसाहत यांनी लिहिले असून, गीतकार इरशाद कामिल यांचे गाणेही चित्रपटात आहेत. हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ‘ढाई आखर’ या चित्रपटात ‘हर्षिता’ च्या भूमिकेत दिसणार आहेत. इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता हरीश खन्ना आणि मराठमोळा अभिनेता रोहित कोकाटे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
‘ढाई आखर’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुप्रसिद्ध लेखक असगर वजाहत यांनी लिहिले आहेत. या उत्कृष्ट चित्रपटाच्या टीममध्ये गीतकार इरशाद कामिल, हिंदी आणि बंगाली संगीत दिग्दर्शक अनुपम रॉय आणि गायिका कविता सेठ यांचा समावेश आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर गेल्या वर्षी झालेल्या IFFI पुरस्कार सोहळ्यात झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘ढाई आखर’ 22 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.