मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच नवनवीन विषय हाताळत असते. अशीच एक नवी कोरी मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बॉस माझी लाडाची’ (Boss mazi Ladachi) ही मालिका २८ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. दररोज रात्री ८:३० वा. ही मालिका पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashri limaye) आणि नवोदित अभिनेता आयुष संजीव(Aayush sanjiv) हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गिरीश ओक,(Girish oak) रोहिणी हट्टंगडी, (Rohini Hattangadi) माधवी जुवेकर(Madhavi juvekar) हे नावाजलेले कलाकारही या मालिकेत आहेत. मनवा नाईक(Manava Naik) हिच्या स्ट्रॉबेरी या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे.
या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये बऱ्याच काळाने छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. भाग्यश्रीने याआधीही आपल्या अभिनयाने आणि निरागसतेने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण या वेळी मात्र ती एका बॉसच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आयुष संजीव हा मालिकेत मुख्य भूमिका पहिल्यांदाच साकारतो आहे.
या मालिकेद्वारे ऑफिसमधली धमाल प्रेमकहाणी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. घरची बॉस तर बायको असतेच पण जेव्हा ऑफिसची बॉसही बायको असते, तेव्हा मात्र काही खरं नाही. अशीच गत झाली आहे मिहिरची कारण त्याची बायकोच आहे त्याची बॉस. बॉस राजेश्वरी आणि कर्मचारी मिहिर यांची ही गोष्ट आहे. यांचं गोड असं एक कुटुंब आहे ज्यात आजी, आजोबा, काका, काकू, भावंडं आणि एवढंच नाही तर एक मांजरसुद्धा आहे. आता हे गोड कुटुंब, बॉस-बायको राजेश्वरी आणि मिहिर या सगळ्यांना प्रेक्षक २८ फेब्रुवारीपासून भेटू शकणार आहेत.