फोटो सौजन्य - Social Media
प्रसिद्ध अभिनेत्री टिस्का चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा पहिलाच चित्रपट असून, या प्रोजेक्टला प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि निर्माता मनीष मल्होत्रा यांचे भक्कम पाठबळ लाभले आहे. त्यांच्या निर्मितीमुळे या सिनेमाला एक वेगळीच उंची मिळाल्याचे चित्रपटसृष्टीत बोलले जात आहे. कथा, सादरीकरण आणि मांडणी या सर्वच बाबतीत ‘साली मोहब्बत’ वेगळेपण जपणारा सिनेमा ठरत आहे.
या चित्रपटात राधिका आपटे आणि दिव्येंदू यांच्या प्रमुख भूमिका असून, दोघांच्याही अभिनयाचे प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे. नातेसंबंध, विश्वासघात, नैतिक गुंतागुंत आणि योग्य-चुकीच्या सीमारेषेतील सूक्ष्म फरक यांचा शोध घेणारी ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वास्तवतेवर आणि भावनिक संयमावर आधारलेला हा सिनेमा एक ताकदवान सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणून समोर येतो.
या प्रोजेक्टबद्दल बोलताना अभिनेत्री राधिका आपटे यांनी मनीष मल्होत्रासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या, “मनीष मल्होत्रा यांच्यासारखं मोठं नाव जेव्हा एखाद्या प्रोजेक्टसाठी विचारतं, तेव्हा तो क्षण खूप खास असतो. खरं सांगायचं तर, त्यांनी मला या चित्रपटासाठी विचारलं तेव्हा मला वाटलं की ते मला कास्ट करणार आहेत आणि मी खूप भारावून गेले होते. याआधी आम्ही कधीच एकत्र काम केलं नव्हतं आणि आम्ही एकाच वर्तुळातही वावरत नव्हतो.”
राधिका पुढे म्हणाल्या, “एकदा आम्ही डिनरसाठी भेटलो आणि आमचं लगेच छान जुळून आलं. इंडस्ट्रीमध्ये फारच मोजक्या लोकांबद्दल मी असं म्हणू शकते, पण मनीषबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, कलाकारांवर असलेला विश्वास आणि सर्जनशील दृष्टी खरोखरच प्रेरणादायी आहे. म्हणूनच इंडस्ट्रीमध्ये त्यांच्यासारखे लोक फारच कमी असतात.”
ही परस्पर विश्वासाची भावना आणि सर्जनशील जुळवणी ‘साली मोहब्बत’मध्ये स्पष्टपणे दिसून येते. दिव्येंदूने साकारलेली व्यक्तिरेखा अतिशय संयमित आणि प्रभावी ठरते, तर राधिकाने तिच्या भूमिकेला दिलेली भावनिक खोली चित्रपटाला अधिक मजबूत बनवते. एकूणच, ‘साली मोहब्बत’ची कथा, पात्रांची गुंतागुंत आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट एक वेगळा आणि लक्षात राहणारा अनुभव देतो. स्लो-बर्निंग थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा नक्कीच पाहण्यासारखा ठरत आहे.






